लातूर (Latur):- माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (JSPM) संचलित येथील जुन्या एमआयडीसी (MIDC)परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद राजेभाऊ खोपे (रा. पांगरी, ता. परळी) या इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात भाजपा नेते तथा ‘जेएसपीएम’ संस्था अध्यक्ष अजित शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दि. २९ जुलै रोजी संस्थेतच सदर मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी मुलाच्या खुनाचा आरोप करीत मृतदेह (dead body)ताब्यात घेण्यास नकार दिला होता. आता याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सूर्यवंशी नामक व्यक्तींवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
‘जेएसपीएम’ संस्थेत अरविंद खोपे या मुलाचा मंगळवारी पहाटे संशयास्पद मृत्यू झाला. मुलाचा खून करण्यात आल्याचा आरोप करीत पालक व नातेवाईकांनी ‘जेएसपीएम’ संस्थेसमोर आक्रोश करीत ठिय्या मांडला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘जेएसपीएम’ संस्थेत कर्तव्यावर असलेल्या टेकाळे व सूर्यवंशी नामक व्यक्तींवर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अरविंदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी(Autopsy) मंगळवारीच येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(Medical College) व रुग्णालयात आणला गेला; परंतु अरविंद याच्या मृतदेहाची स्कॅनिंग करावी आणि इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी नातेवाईकांनी केल्याने अरविंदचे शवविच्छेदन बुधवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास अरविंदच्या मृतदेहाचे स्कॅनिंग करून इन कॅमेरा शवविच्छेदन सुरू झाले. ते दुपारपर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर अरविंदचे पालक व नातेवाईकांनी अरविंदच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी ‘जेएसपीएम’चे अध्यक्ष अजित शिवाजी पाटील कव्हेकर यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, जोपर्यंत ‘जेएसपीएम’च्या संस्थाध्यक्षावर गुन्हा दाखल होत नाही; तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली.
पालकांनी अरविंदचा मृतदेह स्वीकारून अन्त्यविधीसाठी पांगरीला रवाना
अरविंदचे पालक व नातेवाईक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने एमआयडीसी पोलिसांनी सहदेव गणपती तरकसे, (रा. मोतीनगर लातूर) यांचा पुरवणी जबाब घेतला. अरविंदच्या मृत्यूस ‘जेएसपीएम’ संस्थाध्यक्ष अजित शिवाजी पाटील कव्हेकर, प्राचार्य गोविंद शिंदे, त्यांचे सहकारी बिराजदार सर आणि सुरक्षा रक्षक हे जबाबदार असून यांची नावे फिर्यादीत समाविष्ट करावीत, असा जबाब सहदेव तरकसे यांनी पुरवणी जबाबात दिला. पोलिसांनी तरकसे यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेऊन तसे पत्र एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांच्या स्वाक्षरीने अरविंदच्या पालकांना देण्यात आले. त्यानंतर पालकांनी अरविंदचा मृतदेह स्वीकारून अन्त्यविधीसाठी पांगरीला रवाना झाले.
याच प्रकरणात अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी फुंदे करीत आहेत.