लातूर(Latur) :- शहरातील एमआयडीसी (MIDC)भागात असलेल्या स्वामी विवेकानंद आश्रम शाळेच्या वसतिगृहात(Hostel) इयत्ता 7 वीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे निदर्शनास आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून केल्याचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार
एका नववीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual assault)करून जीवे मारल्याची घटना ताजी असतानाच लातुरात पुन्हा ऱ्हदयद्रावक घटना घडली. याबाबत माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील पांगरी (ता. परळी) येथील रहिवाशी असलेला अरविंद खोपे हा विद्यार्थी येथील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत शिकण्यासाठी होता, आणि तो राहण्यासाठी शाळेच्या वसतिगृहात होता. शाळेत परीक्षा असल्याने कालच त्याच्या पालकांनी शाळेत आणून सोडले. पालक गावी पोहचताच रात्री अकरा वाजता तुमच्या मुलाच्या पोटाला काहीतरी जखम झाली आहे आणि तुम्ही लवकर या, असा फोन वसतिगृह कर्मचाऱ्यांनी केला. रात्रीच्या वेळी पालकांना शक्य नाही म्हणून अरविंदच्या पालकांनी नातेवाईकास वसतिगृहात पाठवले असता तुमचा मुलगा पळून गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याचा शोधशोध घेत असताना पहाटेच्या वेळी वसतिगृह कर्मचारी (employees)मुलाला घेऊन बाहेर पडत असल्याचे नातेवाईकांनी पाहिले. त्यांनी कर्मचाऱ्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. त्यामुळे यांचा संशय बळावला असून कर्मचाऱ्यांनीच आमच्या मुलाला मारलं, संबंधितावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मृतदेह घेणारं नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. मंगळवारी उशिरापर्यंत मुलाचा मृतदेह वसतिगृह कार्यालयात पडून होता. मृत मुलाचे काका यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.