मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले
हिंगोली (Hingoli Swachh Bharat Mission) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम दि. 17 सप्टेंबर ते दि.1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (Neha Bhosle) यांनी दिली आहे. यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” (Swachh Bharat Mission) ही थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध दैनंदिन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
17 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ गाव, तालुका व जिल्हास्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबीर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबविण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठे, सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते व महामार्ग, पर्यटन स्थळ, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले या ठिकाणांची साफसफाई ग्रामस्थ, एनएसएस व एनसीसी, विविध मंडळे, सामाजिक संस्था व विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
गावातील खाऊ गल्ली किंवा बाजार पटांगणामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबवून स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमात पथनाट्य व कलापथक यांची स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम (Swachh Bharat Mission) आयोजित करण्यात येणार आहेत. प्लास्टिक जनजागृतीसाठी एकल प्लास्टिक टाळण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व कुटुंबांना गृहभेटीद्वारे जनजागृती करून ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर खासदार व आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत, स्वच्छता दौड, स्वच्छता सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
गावामध्ये टाकावूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची टाकावूपासून टिकाऊ वस्तू तयार करणेबाबत स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गावातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती करण्यात येणार आहे. कायम अस्वच्छ व दुर्लक्षित ठिकाणांची साफसफाई करण्यात येणार आहेत. वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत, शोष खड्डा निर्मिती करण्यात येणार आहे.
29 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्वच्छतेची वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 01 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. दि. 2 आक्टोबर 2024 रोजी ग्रामसभा घेऊन ‘स्वच्छ माझे अंगण’ स्पर्धेतील सर्वोत्तम कुटुंबास सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या कालावधीमध्ये दैनंदिन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी. गावस्तरावर गणेश उत्सव मंडळे, महाविद्यालय, शाळा, एनएसएस विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, शासकीय, निम शासकीय कार्यालय यांचा सहभाग घेऊन दैनंदिन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक संजय कुलकर्णी यांनी केले आहे.