हिंगोली (Hingoli):- वसमत शहरातील बुधवार पेठ भागात भरमार बंदुकीसह (gun) दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध रित्या शस्त्र बाळगणार्यांवर कारवाईची धडक मोहीम सुरू
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध रित्या शस्त्र (weapon) बाळगणार्यांवर कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. वसमत शहरातील बुधवार पेठ भागात दोघेजण बंदुक घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ३० ऑक्टोंबरला मिळाल्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता श्रीकांत उर्फ टिल्या बाबुराव सांडे रा. बुधवारपेठ वसमत, शुभम उर्फ माधव राजु पतंगे, रा. शहरपेठ वसमत हे दोघे जण मिळून आले दोघांनी शहर पथकाने झडती घेतली असता त्यांच्याकडे २५ हजार रुपये किंमतीची भरमार बंदुक मिळून आले. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसमत शहर पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकांत उर्फ टिल्या बाबुराव सांडे व शुभम उर्फ माधव राजु पतंगे या दोघा विरूध्द भारतीय हत्यार (weapon) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कपिल आगलावे, जमादार गजानन पोकळे, किशोर कातकडे, पांडुरंग राठोड, विठ्ठल काळे, किशोर सावंत यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.