काळ बदलला, सत्ता नवी पण तालिबान तेच…
तालिबान (Taliban Restriction) : अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने गेल्या आठवड्यात नवीन कायदे लागू केले आहेत. हे नवे कायदे, ‘सदाचाराचा प्रसार करण्यासाठी आणि दुर्गुण नष्ट’ करण्यासाठी असल्याचे तालिबान सरकारचे म्हणणे आहे. मात्र संयुक्त राष्ट्रसंघाने या निर्बंधांचा निषेध केला आहे. (Taliban government) तालिबान सरकारच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलण्यास बंदी घातली आहे. तसेच घराबाहेर चेहरा झाकण्याचाही आदेश देण्यात आला आहे. हा कायदा आणण्यामागचे कारण म्हणजे, महिलांच्या आवाजानेही पुरुषांचे मन विचलित होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या बोलण्यावरही बंदी आणली आहे.
महिलांनी सार्वजनिक ठिकाणी गप्प राहायचं…
तालिबानचे सुप्रीम लीडर मुल्ला हिबातुल्लाह अखुंदजादा यांनी (Taliban Restriction) नव्या कायद्याला मंजुरी दिली. या कायद्याला हलाल आणि हराम या 2 भागात विभागले गेले आहे. तालिबानने महिलांना घरात गाणे म्हणायला आणि जोरात आवाजात वाचण्यासही मनाई केली. महिलांचे कपडे पातळ, तोकडे किंवा घट्ट असता कामा नये. जे पुरुष महिलांच्या रक्ताच्या नात्यातील किंवा विवाहामुळे नात्याचे नसतील. अशा पुरुषांसमोर महिलांनी त्यांचे शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकला पाहिजे. पुरुषांना महिलांच्या शरीराकडे आणि चेहऱ्याकडे पाहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय वयस्क महिलांना देखील पुरुषांकडे पाहण्यास मनाई आहे. ज्या महिला किंवा मुली या कायद्याचे पालन करणार नाही, त्या दोषी आढळल्या तर त्यांना कठोर शिक्षा दिली जाणार आहे.
पुरुषांची मूठभर दाढी, काय आहेत नवे निर्बंध?
महिलांप्रमाणेच नव्या कायद्यात पुरुषांवर देखील काही बंधने घालण्यात आली आहेत. यापुढे अफगाण पुरुषांना घराबाहेर पडताना नाभीपासून ते गुडघ्यापर्यंतचे त्याचे शरीर झाकावे लागणार आहे. कारण पुरुषांच्या शरीराच्या या भागांना ‘अवराह’ मानले जाते. पुरुषांना शरिया विरोधात असणारी केशरचना म्हणजेच हेअर स्टाईल करता येणार नाही. हा आदेश शरियानुसार असल्याचे तालिबानचे (Taliban Restriction) म्हणणे आहे. नव्या नियमावलीनुसार दाढी मूठभर लांब (किमान हाताच्या मुठीत पूर्णपणे येईल एवढी लांब) असली पाहिजे. या नैतिक कायद्यानुसार पुरुषांना टाय घालण्यास मनाई करण्यास आली आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, प्रार्थना आणि इस्लामिक कायद्याचे आणि इस्लामच्या पाच स्तंभांचे पालन करण्याबरोबरच महिलांना हिजाब घालण्यास प्रोत्साहन दिले आहे. इस्लामिक कायद्याद्वारे निषिद्ध मानल्या गेलेल्या कृत्यांना दूर ठेवणे हे देखील नियमांचे उद्दिष्ट आहे.
तालिबान शासकांनी 2021 मध्ये अफगाणिस्तान देश ताब्यात घेतला. तेव्हापासून आजपर्यंत या देशात (Taliban government) तालिबानी सरकारने कठोर धोरणे लागू केली आहेत. तालिबान रोज नवनवीन फतवे काढून महिलांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. 18 सप्टेंबर 2021 रोजी तालिबानने माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलींवर बंदी घातली. त्यानंतर 20 डिसेंबर 2022 रोजी तालिबान सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली. एवढेच नाही, तर तिथे महिला शिक्षकांवरही बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींसाठी जागतिक स्तरावरील सर्वात वाईट परिस्थिती आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले होते. एकूणच अफगाणिस्तानात नवीन कायदा लागू करण्यात आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे.