हिंगोली(hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील ३५ वर्षीय तरूणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मुलाना कसे शिकवावे व त्यांना कशी नोकरी लागणार, या चिंतेतून टी.व्ही.केबलच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याने हट्टा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
तरूण हा मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय
औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथील बालाजी सुधाकर नेव्हल (३५) हा तरूण मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रिय होता. शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मागणीकरीता जिल्ह्यात झालेल्या अनेक ठिकाणच्या आंदोलनात त्याने सक्रिय सहभाग नोंदविला होता. मध्यंतरी शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले; परंतु मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी केली असता त्याकडे कानाडोळा करून कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.
जेवण करून गेला खोलीत आणि घेतला गळफास
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याकरीता शासन चाल-ढकल करीत असल्याने आपल्या दोन मुलांना कसे शिक्षण द्यावे व त्यांना नोकरी कशी लागणार, अशी चिंता बालाजी नेव्हल यास मागील काही महिन्यापासून भेडसावत होती व ही चिंता त्याने नातेवाईकांसमोरही व्यक्त केली होती. १० जून रोजी नेहमी प्रमाणे बालाजी जेवण करून आपल्या खोलीत गेला. त्यानंतर खिडकीच्या लोखंडी जाळीला टी.व्ही.च्या केबलने आपल्या गळ्याला गळफास आवळला. याचवेळी हा प्रकार कुटुंबियाच्या लक्षात येताच त्यांनी बालाजीला तात्काळ रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी गोविंद नेव्हल यांनी हट्टा पोलिसात दिलेल्या माहितीवरून ११ जूनला रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार भूजंग कोकरे, राम गडदे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास भूजंग कोकरे हे करीत आहेत.