हिंगोली(Hingoli):- मराठा समाजाला आरक्षण मिळेनासे झाले. तसेच शेतातील नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या चिंतेत वसमत तालुक्यातील तेलगाव येथील २२ वर्षीय युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणा करीता जिल्ह्यातील ही ३१ वी घटना आहे.
वसमत तालुक्यातील तेलगाव येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील तेलगाव येथील पंडितराव कानोडे यांना चार एकर शेती असून शेतीवर त्यांनी एका खासगी बँकेचे ४ लाख रूपये व राष्ट्रीयकृत बँकेचे अडीच लाख रूपये कर्ज घेतले आहे. मागील काही वर्षात सतत होणारी नापिकी त्यामुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न कानोडे कुटुंबियासमोर उभा टाकला होता. रामेश्वर कानोडे याने पोलिस दलात भरतीसाठी दोन वेळा प्रयत्न केले होते; परंतु आरक्षण नसल्यामुळे ता नोकरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यातच मराठा आरक्षणा करीता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा सकल मराठा समाजाने आंदोलन केले. त्यातही रामेश्वर कानोडे याने सहभाग नोंदविला. तसेच झालेल्या सभा, बैठकातही त्याने स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरीता होत असलेली दिरंगाई तसेच शेतातील नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचेनेतून ८ सप्टेंबरला शेतात जातो म्हणून तो घराबाहेर पडला होता.
शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
९ सप्टेंबरला रामेश्वरचा मृतदेह (dead body) शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत काही शेतकर्यांच्या निदर्शनास आला. याची माहिती हट्टा पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार महेश अवचार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ज्यामध्ये रामेश्वरच्या खिशात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये आढळून आले. याप्रकरणी ईश्वर कानोडे यांनी हट्टा पोलिसात दिलेल्या माहिती वरून आकस्मात मृत्यूची (sudden death)नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय केंद्रे हे करीत आहे.