लातूर(Latur) : – शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी 23 मे 2023 रोजी बदल्यांचे ऑनलाईन (online) धोरण प्रसिद्ध केले असून नवीन शिक्षक भरती होण्याअगोदर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्यावर्षी लोकसभेच्या आचारसंहितेमुळे या बदल्या झाल्या नव्हत्या. काल शुक्रवारी (दि.28) निघालेल्या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
पहा, कामाला लागा! वेळापत्रक झाले जाहीर!!
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये वीस-बावीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने तसे वेळापत्रकच प्रसिद्ध केले आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी 23 मे 2023 रोजी बदल्यांचे ऑनलाईन धोरण प्रसिद्ध केले आहे. गेल्यावर्षी लोकसभेच्या (Lok Sabha) आचारसंहितेमुळे या बदल्या शक्य झाल्या नव्हत्या. सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनानुसार 1 मार्चपासून 10 मार्चपर्यंत बदली पोर्टलवर शिक्षकांच्या प्रोफाइल अद्यावत करावयाच्या आहेत. सर्व जिल्हा परिषदेने 11 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये पोर्टलवर(Portal) रिक्त पदे अपलोड करायची आहेत.
6 एप्रिल पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार
बदलीच्या प्रतीक्षेतील शिक्षकांना 14 मार्च ते 20 मार्च या कालावधीत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. काही प्रकरणात न्यायालय व विभागीय आयुक्तांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार शिक्षकांना बदल्यात प्राधान्य दिले जाणार आहे. 21 मार्च ते 25 मार्च या कालावधीत सर्व अर्जाची पडताळणी करून 6 एप्रिल पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बदली वेळापत्रकाबरोबर यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि, संबंधित जिल्हा परिषदांकडून (Zilla Parishad) अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत, दि.२३.५.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी, ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील, अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शविण्यात यावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.