नवी दिल्ली(New Delhi):- बांग्लादेशातील शेख हसीना(Sheikh Hasina) सरकारच्या हकालपट्टीनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत. बांग्लादेशला लागून असलेल्या भारतीय सीमांवर पूर्ण दक्षतेने लक्ष ठेवले जात आहे. बीएसएफने (BSF)आपल्या निगराणी क्षेत्राच्या सीमेवर अलर्ट जारी केला आहे. घुसखोरी होऊ नये यासाठी सुरक्षा दलांना बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएफने ४,०९६ किमी लांबीच्या सीमेवर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी आणि त्यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी भारत-बांग्लादेश सीमा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालला पोहोचले आणि उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या. डीजींनी उत्तर 24 परगणा जिल्ह्याच्या सीमेलाही भेट दिली.
डीजींनी उत्तर 24 परगणा जिल्ह्याच्या सीमेलाही भेट
अलीकडेच, 10-15 बांग्लादेशी घुसखोरांनी पश्चिम बंगालच्या 24 परगना जिल्ह्यातील भारत-बांग्लादेश सीमेवरील अमुदिया सीमा चौकीजवळ भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. असे सर्व संवेदनशील प्रवेश बिंदू चिन्हांकित केले गेले आहेत आणि तेथे विशेष दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. बांग्लादेशाकडून नादिया जिल्ह्यातील मलुपारा, हलदेरपारा, बानपूर आणि मतियारीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष पाळत ठेवली जात आहे. मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यातील चारमराशी आणि मालदा जिल्ह्यातील सासनी सीमा चौकीही संवेदनशील असल्याचे सांगण्यात येत आहे. बीएसएफने बॉर्डर गार्ड्स बांग्लादेशीही संपर्क प्रस्थापित केला आहे.
बांगला टीमचे अनेक सदस्य तुरुंगातून पळून गेल्याची गुप्तचर माहिती
बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या अशांततेदरम्यान, प्रतिबंधित इस्लामिक दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिदीन बांग्लादेश (जेएमबी) आणि अन्सारुल्ला बांगला टीमचे अनेक सदस्य तुरुंगातून पळून गेल्याची गुप्तचर माहिती मिळाली आहे. ते भारतात येण्याच्या शक्यतेबाबत एजन्सी सतर्क आहेत. भारत आणि बांग्लादेशाच्या सीमावर्ती राज्यांमध्ये या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. अनेक प्रसंगी, भारतातील सुरक्षा यंत्रणांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधून या संघटनांच्या सदस्यांना अटक केली आहे. या दहशतवादी संघटनांचे सदस्य सध्याच्या गोंधळाचा फायदा घेऊन भारतात घुसखोरी करू शकतात, असा संशय आहे. भारत आणि बांगलादेश 4,096 किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करतात, ज्यामध्ये आसाममध्ये 262 किमी, त्रिपुरामध्ये 856, मिझोराममध्ये 318, मेघालयमध्ये 443 आणि पश्चिम बंगालमध्ये 2,217 किमीचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी राज्य सरकारांना अलर्टही पाठवण्यात आला आहे.