कापूस उत्पादन व वापर समितीची कापूस हंगाम 2023-24 साठी तिसरी बैठक संपन्न
उद्योगांची वाटचाल सुयोग्य मार्गावर सुरू असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्तांचे प्रतिपादन
मुंबई : कापूस उत्पादन व वापर समिती (सी.ओ.सी.पी.सी.)ची 2023-24 च्या कापूस हंगामासाठी तिसरी बैठक आज 24 जून 2024 रोजी वस्त्रोद्योग मंत्रालयातील वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासह कापड उद्योजकांचे प्रतिनिधी, कापूस व्यापार व जिनिंग, प्रेसिंग क्षेत्राचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. राज्यनिहाय कापसाखालील क्षेत्र, उत्पादन, आयात, निर्यात आणि कापसाचा वापर या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी सांगितले की कापड उद्योगांसाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध आहे. कापसाचा वापर वाढला असून गेल्या दहा वर्षांत यंदाचे वर्ष सर्वाधिक वापराचे दुसरे वर्ष ठरले आहे. वस्त्रोद्योग आयुक्त पुढे म्हणाल्या, “उद्योग सुयोग्य मार्गावर वाटचाल करत असून आकडेवारीतून चांगला वापर झाल्याचे दिसून येईल अशी आम्हाला आशा आहे.” कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की पारदर्शकता आणि चांगल्या कापसाच्या पुरवठ्यासाठी कापसाच्या प्रत्येक गासडीचा क्यूआर कोडच्या आधारे मागोवा घेतला जाईल. त्यामध्ये कोणत्या गावातून कापूस आला, कोणत्या कारखान्यात त्यावर प्रक्रिया झाली आणि विक्रीची तारीख या माहितीचा समावेश असेल.