कळमनुरी/हिंगोली (Hingoli):- सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सोमवारी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime)दाखल केला असून तो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी (MIDC) पोलिसांकडे वर्ग केला आहे.
सप्ताहाच्या प्रवचनात एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले
सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे मठाधिपती रामगिरी महाराजांचा अनेक ठिकाणी निषेध नोंदवून त्यांच्यावर विविध ठिकाणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात कळमनुरीत मुस्लिम समाजातर्फे १९ ऑगस्टला बंदची हाक देण्यात आली होती. मुस्लिम समाजाच्या (Muslim community) शिष्टमंडळा सोबत पोलिसांच्या झालेल्या चर्चेदरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी सहमती दर्शविल्याने हा बंद मागे घेण्यात आला. सोमवारी रात्रीच्या सुमारास कळमनुरी नुरी मोहल्ला भागातील शेख साजीद शेख अल्लाबक्ष यांनी दिलेल्या तक्रारीत मठाधिपती रामगिरी महाराजांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच असामाजिक शांतता निर्माण होईल असे आक्षेपार्ह वक्तव्य सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रवचनात केल्याचा आरोप केल्याने मठाधिपती रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने कळमनुरी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.