कळमनुरी (Hingoli) :- कळमनुरी शहरातील शिवसेनेचा प्रचार करीत असल्याचे व्हिडीओ चित्रीकरणात (Video shooting) आढळून आल्याने ग्रामसेवक शिवशंकर शेषराव गुड्डे यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामसेवक शिवशंकर शेषराव गुड्डे यांच्या विरूद्ध कारवाई
कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत एक आदेश जारी केले आहेत. यामध्ये नमूद आहे की, कळमनुरी शहरातील शास्त्रीनगर भागात शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शिवशंकर शेषराव गुठ्ठे हे प्रचार करीत असल्याबाबतचे व्हिडीओ चित्रीकरण प्रसारीत झालेले आहे. या चित्रफितीची दखल घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी कळमनुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ असलेल्या ग्रामसेवक शिवशंकर शेषराव गुड्डे यांच्या विरूद्ध गटविकास अधिकारी स्तरावरून नियमानुसार कार्यवाही (Proceedings) करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्याशी सदर प्रतिनिधीने संपर्क साधला असता या प्रकरणात शिवशंकर गुड्ढे यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कर्तव्य असलेल्या बजावत शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात प्रचार करू नये असा नियम असल्याने या प्रकरणात निवडणूक विभाग काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.