मानोरा (Manora) :- बहुजनांची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी दि. १५ फेब्रुवारी हजारो सेवा भक्तांच्या साक्षीने सदगुरू संत सेवालाल महाराज यांचा २८६ वा जन्म सोहळा भोग भंडारा, महाआरती व पाळणा गीत गायन करून मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी जय सेवालाल बापूंच्या जयघोषाने आसमंत गुंजून गेला होता.
जय सेवालाल जयघोषाने आसमंत गुंजला
तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत सदगुरू संत सेवालाल महाराज जयंती निमीत्त सप्ताह भरापासून श्रीमद् भागवत सप्ताह, ग्रंथ लिलामृत कथा, कलश पालखी सोहळा शोभायात्रा मिरवणुक, भजन, कीर्तन आदीसह विविध धार्मिक कार्यक्रम (Religious events) पार पडले. जयंतीदिनी १५ फेब्रुवारीला शनिवारी पहाटे ४ वाजता कलश यात्रा पालखी सोहळा, शोभा यात्रा मिरवणुकीला सुरूवात झाली. पालखी सोहळयांचा समाधीस्थळी मंदीरात १२ वाजता आगमन होताच पुजारी महंत कबिरदास महाराज यांनी धर्मगुरु आ. बाबुसिंग महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज, महंत रायसिंग महाराज, महंत गोपाल महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आरदास गायन करून भोग भंडारा अर्पण केला.
यावेळी संत सेवालाल महाराज जयंती सोहळ्याला मृद व जल संधारण मंत्री ना. संजय राठोड, राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक, आमदार राजेश राठोड, माजीं खा. हरीभाऊ राठोड आदीसह देशभरातील हजारो सेवा भक्तांची जयंती सोहळ्याला उपस्थिती होती. संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोहळा पार पडताच हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.