परभणी(Parbhani) :- येथील जिल्हा परिषद माध्यमिक विभागाला (Zilla Parishad Secondary Division)सोमवारी सीईओ नतीशा माथुर यांनी अचानक भेट देवून झडती घेतली. यावेळी कार्यालयात अनावश्यक काही व्यक्ती फिरत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश सीईओ (CEO) यांनी दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे पुन्हा माध्यमिक शिक्षण विभाग चर्चेला आले आहे.
रामदास पवार विषय पुन्हा चर्चेत
परभणी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग हे मागील कित्येक वर्षापासून चर्चेत आहे. बोगस शिक्षक व शिक्षकेत्तर भरती झालेली आहे. अनेक चौकशीत समोर देखील आले आहे. माजी शिक्षणाधिकारी आशा गरुड व विठ्ठल भुसारे यांच्यावर निलंबनाची काही काळापर्यंत कारवाई देखील झाली. त्यानंतर हे दोघेही शिक्षणाधिकारी रुजु झाले. चौकशी अजुनही चालूच आहे. तक्रार करणारे देखील शांत बसले. तर काहीजण आजही न्यायाची अपेक्षा लावून आहेत. अधिक्षक कंठाळे देखील अनेक तक्रारी असताना परभणी येऊन परत शिक्षण विभागाचा गाडा पूर्ववत हाकत आहेत. काही महिने शिक्षण विभाग शांत झाला होता. परंतु सीईओ नतीशा माथुर यांनी सोमवारी अचानक भेट देवून पुन्हा चर्चेत आणला. अलका सोळंके यांनी शिक्षण विभागाची तक्रार करुन सीईओंचे लक्ष वेधले. खाजगी शाळेवरील लिपीक रामदास पवार यास पुन्हा शिक्षण विभागात कामावर घेतल्याने वादंग उठले आहे. तसेच शिक्षण विभागात अनेकजण अनावश्यक फिरताना सीईओं यांच्या निदर्शनास आले. काहीसा प्रकार संशयास्पद दिसल्याने सीईओ यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. काहीवेळ तणावाचे वातावरण होते.