परभणी (Parbhani) :- सेलू शहरातील हनुमान गढी नूतन विद्यालय परिसरात मंगळवार २५मार्चपासून रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या अमृतमय रसाळ वाणीतून संगीत तुलसी रामकथेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या निमित्य सायंकाळी पाच वाजता सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरापासून (Temple) भव्य शोभायात्रा मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली होती.
माता भगिनी महिला व वारकरी भजनी मंडळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी
जय श्रीराम आणि ज्ञानोबा तुकाराम जयघोषाने अवघी सेलू नगरी दुमदुमून गेली होती. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशत्कोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा व गुरुवर्य श्री संत नथुराम बाबा केळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त (ceremony) प्रसिद्ध उद्योजक तथा सेलू तालुक्याचे भूमिपुत्र तालुक्यातील घोडके पिंपरी येथील रामप्रसादजी घोडके यांच्या परिवाराच्या वतीने २५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी सात ते दहा या वेळात कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ मार्च सायंकाळी सात वाजता शहरातील मिरवणुकी नंतर रामराव ढोक महाराज यांचे कथास्थळी आगमन झाले. यावेळी त्यांच्या समवेत रामप्रसादजी घोडके ,राजेंद्र घोडके ,डॉ. कैलास आवटे सह इतर भाविक यांचे आगमन झाले. दरम्यान शोभायात्रा मिरवणुकीत रथामध्ये रामायण आचार्य रामरावजी महाराज ढोक विराजमान होते.बँड पथक कलश व तुळशीधारी माता भगिनी महिला व वारकरी भजनी मंडळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संगीत साधना आश्रम संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि ताडबोरगाव येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घातलेल्या पाऊलीने सेलुकरांचे लक्ष वेधले. कथासोहळ्यात रविवार ३० मार्च रोजी वारकरी गौरव आणि संत पूजन होणार आहे. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद आहे. कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रामप्रसाद घोडके, भगवानराव घोडके ,अशोक घोडके, अंबादास घोडके, डॉ. रवींद्र घोडके, राजेंद्र घोडके, देवराव काळे, डॉ. केदार खटिंग, डॉ.कैलास आवटे, डॉ. शंकरराव काळे आदींनी केले आहे. रामराव महाराज ढोक यांच्या संगीत तुलसी रामकथेला सायंकाळी सात वाजता प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी महिला व पुरुष भाविकांनी संपूर्ण परिसर खचाखच भरला होता.