परभणी/गंगाखेड(Parbhani) :- येथून मरडसगाव मार्गे नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती (मालवाहू ऑटो) व पालम येथून मरडसगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यु (Death)झाला आहे. ही घटना शुक्रवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली असुन बालाजी परमेश्वर पांढरे असे मृतकाचे नाव आहे.
दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड येथून मरडसगाव मार्गे नांदेडकडे जाणाऱ्या छोटा हत्ती (मालवाहू ऑटो) क्रमांक एमपी २० जीबी ५०७३ व पालम येथून पाहुण्याकडे असलेल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी मरडसगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीचा (क्रमांक एमएच २६ एम ४४८०) शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १:४० वाजेच्या सुमारास पालम रस्त्यावर मरडसगाव ते संभाजीनगर दरम्यान समोरासमोर अपघात (Accident) झाला. अपघातात बालाजी परमेश्वर पांढरे वय ३० वर्ष रा. टाक गल्ली पालम या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची घटना समजताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, पो. शि. शंकर गयाळ, पालम येथील १०८ रुग्णवाहिकेचे (Ambulance)चालक राजाराम लांडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या जखमीला गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी मृतकाचे वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.