परभणी (Parbhani):- विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहे. ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिते पूर्वी विविध विकास कामे करण्याचा लोकप्रतिनिधींचा मानस आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महापालिकेला विविध विकासकामांची यादी प्राप्त झाली आहे. या यादीनुसार कामांच्या निविदा लावण्याचे काम महापालिकेत युध्द पातळीवर सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही कर्मचारी कार्यालयात बसून निविदांचे काम करत होते.
१४७ कामांच्या निविदा लावण्यात आल्या
जिल्हा नियोजन समितीमधील कामांमुळे मोठा वाद झाला. न्यायालयीन प्रक्रियाही झाली. आता महापालिकेला (Municipal Corporation) सन २०२३ – २४ आणि सन २०२४- २५ या वर्षात जिल्हा नियोजन समिती महापालिका अंतर्गत विविध विकासकामे करण्याबाबत यादी प्राप्त झाली आहे. या यादीत शहरातील विविध भागात सिमेंट रस्ते, नाली, गट्टू, पथदिवे या सारख्या मुलभुत सुविधांसह इतर कामे करण्यात येणार आहेत. दलितोत्तर विकास निधी प्राप्त झाला आहे. यादीतील २१० कामांपैकी १४७ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित कामाच्या निविदा लावण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या ६९ कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामे होणार आहेत. दलित वस्तीमधून देखील शहराला जवळपास ३० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. समाज कल्याण विभागाकडून (Department of Social Welfare) सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सदर निधी महापालिकेला मिळेल. शंभर कोटी पेक्षा अधिक निधी मनपाला मिळण्याची अपेक्षित आहे. या निधीतून शहरात होणारी विकासकामे देखील चांगल्या दर्जाची व्हावीत, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे. तब्बल दोन वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीमधील कामांना मुहूर्त लागल्याने लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनील देखील सुटकेचा श्वास सोडला आहे. निविदेनंतर उर्वरित प्रक्रिया लवकर पूर्ण होवून विकास कामांचे कार्यारंभ आदेश संबंधित कंत्राटदारांना लवकर देणे देखील अपेक्षित आहे.