मानोरा(Washim):- मानोरा येथील एमआयडीसीत उद्योगासाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव, प्रशासनाच्या जाचक अटी व उदासिनता यामुळे तालुक्याच्या औद्योगिक विकासाला खिळ बसली आहे. तसेच एमआयडीसीचा (MIDC) सुशिक्षित बेरोजगारांना कोणताही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे या तालुक्यातील बेरोजगार कामाच्या शोधात परप्रांतात जात आहेत. त्यामुळे पालक मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी लक्ष केंद्रीत करून उद्योग व्यावयासायात वाढ होवून सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळावे , यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी युवा कामगार वर्गातून केली जात आहे.
एमआयडीसी परिसरात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
आकांक्षित जिल्हयातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात बोटावर मोजता येईल इतके उद्योग आहे. परिसरात रोजगार उपलब्ध होण्यास उद्योगाची मोठी भूमिका असते. मानोरा ते मंगरुळपीर हायवेवर एमआयडीसी उभारण्यात आली आहे. यात अनेकांनी जागा देखील विकत घेतली आहे. मात्र या भागात उद्योगासाठी आवश्यक मूलभूत सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या नाही. एमआयडीसी परिसरात जागा विकत घेतल्यानंतर निर्धारीत वेळेत उद्योग सुरू करणे गरजेचे असते. मात्र जाचक अटी व शर्ती तसेच सोयी सुविधा अभावी या भागात नवीन उद्योग सुरु झालेले नाही. त्यामुळे यात तालुक्याचे मोठे नुकसान होत आहे. तसेच उद्योग सुरु न झाल्याने तालुक्यातील रोजगार निर्मितीलाही खिळ बसली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.