लातूर(Latur) :- धनगर एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांना ‘धनगड’ म्हणून दिलेले बोगस जात प्रमाणपत्र (Caste certificate) रद्द करावे, यासह अन्य मागण्यांसाठी चार दिवसापासून आमरण उपोषण करणाऱ्या दोन्ही मल्हारयोध्द्यांना पाठिंबा म्हणून उपोषणाच्या चौथ्या दिवशी सकल धनगर समाजाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले. उपोषणाचा गुरुवारी चौथा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती प्रचंड खालावली
धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात समावेश करून अंमलबजावणी करावी, संभाजीनगर जिल्ह्यातील कांही जणांना ‘धनगड’ म्हणून दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करावे. या प्रमुख मागण्यांसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर हे दोघे तरूण ९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी चौथा दिवस असून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा व धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक गंगथडे, अभंग हाळे, सुशीलकुमार होळकर, शिवदास माने, बाळासाहेब होळकर, बालाजी होळकर, भगवान पुजारी, किशन डापकर, विठ्ठल शेवाळे, दयानंद भंडे यांच्यासह सकल धनगर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
तर संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरेल…
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी म्हणून मल्हारयोद्धा हजारे, गोयकर हे उपोषणाला बसले आहेत. आमरण उपोषण आंदोलनाचा चौथा दिवस आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती वरचेवर खालावत चालली आहे. पण महाराष्ट्र शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही शासन वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित आहे, म्हणून उपोषणकर्त्यांची प्रकृती आणखी खालावली तर संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या प्रवित्र्यात आहे, तसे झाले तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून उपोषणकर्त्यांच्या मागणीप्रमाणे धनगर समाजाला एसटी (ST)आरक्षण अंमलबजावणी करण्यासंदर्भात पावले उचलावीत, उपोषणकर्त्यांची डेली मेडिकल चेकअप सुरु करावी, अशी निवेदनातून धनगर समाजाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.