परभणी (Parbhani) :- मागील दहा वर्षात जिल्ह्याच्या उत्पन्नात तिप्पट वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत मुलभुत सुविधांची निर्मीतीच झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात संसाधनांची उपलब्धता असतांना सुध्दा त्याचा योग्य वापर न झाल्याने उद्योग, कृषी क्षेत्रात (agriculture sector) प्रगती झाली नाही.
२०२२-२३ या वर्षाचे चालू किंमतीनुसार सांकेतिक स्थूल जिल्हा उत्पन्न ३७ हजार ९८३ कोटी
जिल्हा उत्पन्नाचे अंदाज हे मागास जिल्हे ठरविण्यासाठी आणि त्यादृष्टीने आंतरजिल्हा असमानता दूर करणे, नागरिकांना मूलभूत सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सुयोग्य विकास योजना, कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी मदत ठरतात. जिल्ह्याचे अचूक उत्पन्न मोजत असताना काही मर्यादा येत असतात. त्यामुळे विविध उत्पन्न स्त्रोत पद्धतींचा यात अवलंब केलेला असतो. त्या उत्पन्न पध्दतीचा आधार घेवून राज्य शासनाने(State Govt) जाहीर केलेल्या जिल्हा उत्पन्ना नुसार परभणी जिल्ह्याचे २०१२-१३ या वर्षाचे चालू किंमतीनुसार स्थूल जिल्हा उत्पन्न १२ हजार ३५३ कोटी होते. तर २०२२-२३ या वर्षाचे चालू किंमतीनुसार सांकेतिक स्थूल जिल्हा उत्पन्न ३७ हजार ९८३ कोटी आहे. यावरून मागील दहा वर्षात जिल्हा उत्पन्नात २५ हजार ६३० कोटींची वाढ झाली आहे. त्याची तुलना केली असता आपणास मागील दहा वर्षात जिल्ह्याच्या उत्पन्नत तिप्पट वाढ झाल्याचे दिसते.
कृषि व इतर क्षेत्रातील गुंतवणूकदार येथे उद्योग उभारण्यास प्राधान्य
मात्र जिल्ह्यात मुलभूत सुविधांची वाणवाच आहे. त्यात मुलभूत सुविधांमध्ये रस्ते, विज, पाणी, भांडवल उपलब्ध करून देणे आवश्यक होते. जिल्ह्यातील दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी, पदवीत्तर शिक्षण (Post Graduate Education) घेऊन बाहेर पडतात. हे विद्यार्थी मुख्यत्वे पुणे(Pune), मुंबई (Mumbai), औरंगाबाद (Aurangabad) सारख्या मोठया शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात जातात. त्यामुळे त्यांना जर जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून दिल्यास स्थलांतर होणार नाही. पर्यायाने त्यांच्या बौध्दीक, कुशल क्षमतेचा जिल्ह्यातच वापर होईल. त्यासाठी जर जिल्ह्यात पायाभूत सुविधांची योग्य प्रकारे निर्मिती झाल्यास कृषि व इतर क्षेत्रातील गुंतवणूकदार येथे उद्योग उभारण्यास प्राधान्य देतील. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल. यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल.