अर्जुनी मोर(Gondia):- स्पर्धेच्या जगात जर जगाच्या स्पर्धेत टिकेल असे गणित अगदी प्राथमिक स्तरावर इयत्ता २ री पासून मांडण्याचा प्रयत्न करणारे व ते सत्यात उतरवणारे शिक्षक एखाद्या शाळेला लाभले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे स्थानिक अर्जुनी/मोर. मधील जि. प. के. प्राथ. शाळा अर्जुनी/मोर क्र. १ येथे कार्यरत शिक्षक नरेंद्र बनकर होय. अतिशय जटिल समजल्या जाणाऱ्या गणितालाच आपली ताकद बनवून, शाळेचा कायापालट करण्यात महत्वाची भूमिका बजावली ती, येथील सहा. शिक्षक नरेंद्र बनकर सरांनी.
मिळाली एका मोडकळीस येऊ लागलेल्या शाळेला संजीवनी
अगदी कोरोना काळात आपल्या विद्यार्थ्यांना गटा- गटात बसवून शिकवण्याचेच नव्हे तर त्यांची अभ्यासातील प्रगती येथील स्थानिक अर्जुनी/मोर व आजूबाजूच्या गावात what’s app group बनवुन पोहोचविण्याचे कार्य केले. शाळेची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने इंग्रजीमय परिपाठ, OUR DREAM SCHOOL नावाचे WhatsApp ग्रुप बनवून त्यावर अध्यापन वर्ग चालवणे, पुढे नवोदय सराव मालिका राबविणे, अशा अनेक उपक्रमातून शाळेचा पाहता- पाहता कायापालट होऊ लागला. गणित या अमूर्त विषयाला मूर्त रूप देण्याची नरेंद्र बनकर या शिक्षकाची हातोटी हा परिसरात कायम चर्चेचा विषय बनलेला आहे. याचाच परिणाम म्ह्णून सदर शिक्षक रुजू झाल्यावर्षी इयत्ता पहिलीत असलेली केवळ ६पटसंख्या लगेच दुसऱ्या वर्षी पहिलीत २४ व पुढे वर्षागणिक ३५, ३३,३७ अशी वाढ होऊन २०१९ ला असलेली शाळेची २९पटसंख्या आज १२० होऊ शकलेली आहे. या कामी आदरणीय नरेंद्र बनकर सरांच्या गणित विषयाची भुरळ पडण्यासोबत विविध उपक्रमांची गुणवत्तेत झालेली परिणती खरी कामास आली.याचे संपूर्ण श्रेय जाते ते, नरेन्द्र बनकरच्या कार्याला अशी पालकवर्गात चर्चा होत आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या कायापालट करणारे शिक्षक नरेंद्र बनकर यांना सलाम !
या शाळेच्या स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या गणिताने आज संख्याज्ञान , गणितीय मूलभूत क्रिया , अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, शेकडा काढणे, नफा तोटा, सरळव्याज, काळ – काम – दिवस, अंतर – वेग – वेळ, भौमितिक आकार व त्यांचे क्षेत्रफळ काढणे सह भूमितीतील वर्तुळ ही संकल्पना यथोचित समजण्यात मुले यशस्वी होऊ शकलेली आहेत. आज परिसरात या शाळेच्या गणिताची वाहवा व त्या विषयाच्या प्रभावाने शाळेचा कायापालट झाल्याची गोष्ट सार्वजनिक झालेली आहे. शहरातील एखाद्या चहावाल्याने विशिष्ट चवीने आपल्या चहाची चहाप्रेमींमध्य भुरळ पाडावी, नेमकी तशीच भुरळ स्थानिक अर्जुनी/मोर सह परिसरातील दहा गावांत गणिताची भुरळ पाडण्यात यशस्वी झालेली व्यक्ती म्हणून या शिक्षकाकडे पाहिल्या जात आहे, हे विशेष. म्हणतात ना, गणित हे जीवनाचेही गणित बनवते. म्हणून तर स्थानिक परिसरातील या शाळेच्या कित्यक पालकांना गणित विषयात विशेष अपेक्षा आहे, हेही विशेष. निश्चितच गणित सारख्या जटिल विषयाला विद्यार्थ्यांच्या घरी उतरवून जिल्हा परिषद शाळेच्या कायापालट करणारे शिक्षक नरेंद्र बनकर यांना सलाम !
नरेंद्र बनकर हे निश्चितच उपक्रमशील शिक्षक असून गणितासारख्या जटील विषयात त्यांनी विद्यार्थ्यांना(Students) पूरक मार्गदर्शन करून अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या पाल्यांना सदर शाळेत प्रवेश दिला. *पालक पुरुषोत्तम गहाणे शिक्षक