सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्यामुळे नाराश्य दांपत्याने केली आत्महत्या
तिहेरी आत्महत्या प्रकरणी परभणी येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी/गंगाखेड (Triple suicide case) : परभणी जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हदरवून सोडणारे तिहेरी आत्महत्याप्रकरण गेल्या आठवड्यात २८ नोव्हेंबर रोजी गंगाखेड शहरात घडले होते. या तिहेरी सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गुढ उकलले असुन याप्रकरणी बुधवार ४ डिसेंबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात परभणी येथील तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरच नव्हे तर परभणी जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हदरविणारे तिहेरी सामूहिक (Triple suicide case) आत्महत्या प्रकरण दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड रेल्वे स्थानकापासून सुमारे दिड किलोमीटर अंतरावर परभणी लोहमार्गांवरील धारखेड शिवारातील रेल्वे रुळावर घडले होते. यात गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मष्णा (मसनाजी) सुभाषराव तुडमे यांच्यासह त्यांच्या पत्नी रंजना मष्णा (मसनाजी) तुडमे, मुलगी अंजली मष्णा (मसनाजी) तुडमे सर्व रा. किनी (कद्दू) ता. अहमदपूर हल्ली मुक्काम काकाणी अपार्टमेंट गंगाखेड या एकाच घरातील तिघांनी गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दुचाकी रेल्वे स्थानकावर लावून रेल्वे स्थानकापासून सुमारे दिड किलो मिटर अंतरावर परभणीच्या दिशेने पायी जात धारखेड शिवारातील सिग्नलजवळ रुळावर झोपून माल वाहतूक करणाऱ्या रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली होती.
एका कुटुंबातील आई, वडील व मुलगी अशा तिघांनी एकाच वेळी रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या (Triple suicide case) केल्याच्या घटनेने गंगाखेड शहर हादरले होते. त्याच दिवशी रात्री याप्रकरणी मयत मष्णा (मसनाजी) तुडमे यांचे मोठे भाऊ शिवाजी सुभाषराव तुडमे वय ५५ वर्ष रा. किनी (कद्दू) ता. अहमदपूर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली व शुक्रवार रोजी उत्तरीय तपासणीनंतर या तिघांचे मृतदेह मूळ गावी नेऊन एकाच चितेवर तिघांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गंगाखेड शहरात घडलेल्या तिहेरी सामूहिक आत्महत्येच्या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असतांना या तिहेरी सामूहिक आत्महत्येचे गुढ कायम होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या (Triple suicide case) घटनेचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांनी बारकाईने तपास करत नातेवाईकांकडे विचारपूस केली असता मयत तरुणीसोबत लग्न करून द्या नाहीतर मी तिच्या सोबतचे माझे व्हिडीओ व्हायरलं करून तुमची बदनामी करेल असे म्हणत २७ नोव्हेंबर रोजी परभणी येथील शिवम नारायण राऊत या तरुणाने मयत तरुणीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दोघांचे फोटो व्हायरल केले त्यामुळे ताणतणावात राहणाऱ्या मष्णा (मसनाजी) तुडमे यांनी होत असलेल्या बदनामी व मानसिक त्रासापेक्षा जिव दिलेला बरा असे एका नातेवाईकाकडे सांगून मष्णा (मसनाजी) तुडमे, रंजना मष्णा (मसनाजी) तुडमे व अंजली मष्णा (मसनाजी) तुडमे यांनी बदनामी व मानसिक त्रासाला कंटाळून धारखेड शिवारात रेल्वे रुळावर मालगाडीखाली सामूहिक आत्महत्या केल्याची फिर्याद शिवाजी तुडमे यांनी दिल्यावरून बुधवार ४ डिसेंबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात शिवम नारायण राऊत रा. परभणी या तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. याचा पुढील तपास स. पो. नि. सिद्धार्थ इंगळे करीत असुन बिट जमादार दिपक व्हावळे हे त्यांना सहाय्य करीत आहेत.