वर्धा (Wardha) :- घरफोड्या करणार्या अट्टल आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत तब्बल बारा गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ही कारवाई केली.
अट्टल आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत तब्बल बारा गुन्हे उघडकीस
वर्धा शहर परिसरात तसेच लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या घरफोडीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन सेवाग्राम परिसरातून सुदर्शन उर्फ रितिक गंगाधर वाडेकर (वय २३), रा. सर्कस ग्राउंड जवळ, रामनगर, वर्धा, रोहित उर्फ लकी अनिल अवसारे (वय २१), रा. गिट्टी फैल, सावंगी (मेघे) वर्धा आणि विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले. घरफोडीबाबत विचारपूस केली असता आरोपींनी वर्धा शहर तसेच आजुबाजुचे परिसरात घरफोड्या केल्याची माहिती पुढे आली. गुन्ह्यात मिळालेले सोने अश्विन विजय चिचपाने (वय २४) रा. मालगुजारीपुरा, वर्धा याच्या मदतीने विल्हेवाट लावली आहे. मुन्ना उर्फ राजन देविदास थूल (वय ३५), रा. आनंदनगर, वर्धा हा अंमली पदार्थ विक्रेता असून आरोपींनी त्यालासुध्दा चोरीतील रक्कम दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल, प्रफुल पुनवटकर, राहुल लुटे, गजानन धरणे, सायबर सेल, वर्धा येथील दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अंकित जिभे यांनी केली.
बारा गुन्हे उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून १२ गुन्हे उघडकीस आणले. १५ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सोन्याचे दागीणे (रवा), चांदीचे २९५ ग्रॅम वजनाचे दागिने, रोख ३७ हजार रुपये, ४ अँड्रॉईड मोबाईल, दुचाकी आदी १५ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून सेवाग्राम पोलिस ठाण्यातील तीन, वर्धा शहर पोलिस ठाण्यातील पाच, रामनगर पोलिस ठाण्यातील दोन, देवळी आणि सेलू पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आणला.