मानोरा(Manora):- तालुक्यात जवळपास ७६ ग्रामपंचायती आहेत. एकूण अंदाजे ४० ग्रामसेवक कार्यरत असल्याचे समजते, काही ग्रामसेवकाकडे एक किंवा त्यापेक्षा ग्रामपंचायतीचा कारभार सोपविण्यात आलेला आहे. परंतु एकही ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक कामासाठी नागरिकांना तालुका ठिकाणी हेलपाटे घ्यावे लागते.
मानोरा तालुक्यात ग्रामसेवकाला मुख्यालयी राहण्याची ऍलर्जी
ग्रामसेवक हे गावाच्या विकासासाठी महत्वाचा घटक आहे. ते शासनाच्या योजना आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करतात आणि गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास मदत करतात. परंतू अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ते मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणी सुटत नाही. आणि विविध शासकीय योजनांची माहितीही मिळत नाही. प्रशासकीय कामे खोळंबून राहतात. दाखले मिळवणे, रेकॉर्ड (Record)तयार करणे तसेच गावातील विकास कामे रखडतात. ग्रामसेवक गावात सतत गैरहजर व मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व असंतोष निर्माण होत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष केंद्रीत करत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या हजेरीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
ग्रामसेवक मुख्यालयी न राहता शासनाचा घरभत्ताही घेतात हे विशेष उल्लेखनीय आहे. प्रत्येक गावातील नागरिकांमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने रोष व्यक्त निर्माण झाला आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.