लातूर (Latur):- लातूरच्या राजकारणात ‘आप्पा’ या नावाला विशेष असं महत्त्व आहे. एका समूहासाठी हे नाव नसून एका कर्तबगार व्यक्तींसाठीही हे नाव आपल्याकडे अनेकदा घेतले जाते. सध्या विधानसभा निवडणुकीच्या(Assembly Elections) धामधुमीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात लढण्यासाठी आणखी एका आप्पांनी जोरदार ‘फिल्डींग’ लावल्याची चर्चा असून त्यांचे समर्थकही या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा त्यांच्या खास समर्थकांमध्ये आहे
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जनसंपर्काच्या रूपाने सगळीकडे मांडला गेला, असे एकेकाळी स्व. विलासराव देशमुख यांचे स्वीय सहाय्यक असलेले शंकरराव भिसे उर्फ आप्पा आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. शंकरराव भिसे हे भोकरंबा येथील मूळ रहिवासी आहेत. रेणापूर तालुक्यातील अनेक राजकीय परिवार त्यांचे स्नेही, नातलग तर आहेतच; शिवाय लातूर तालुक्यातील मुरुड, गातेगाव, तांदूळजा, औसा तालुक्यातील भादा, बोरगा-भेटा परिसरात शंकरराव भिसे यांचे मोठे जाळे आहे. आतापर्यंत ते शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसंपर्कात होते. औसा, उदगीर तसेच नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे तहसीलदार पदावर त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांची कर्मभूमी असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदावर काम केले आहे. अनेक बड्या नेत्यांशी त्यांचा जिव्हाळा, स्नेह आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा त्यांच्या खास समर्थकांमध्ये आहे.
विशेष म्हणजे लातूर ग्रामीणची जागा सध्या महायुतीत शिवसेनेच्या (Shivsena)वाट्याला आहे. यापुढे महायुती अंतर्गत वाटाघाटी होऊन ग्रामीणची जागा कोणत्या पक्षाला जाईल, हे औत्सुक्याचे असले तरी ‘आप्पां’साठी ही जागा सर्वच पक्ष देतील, असा आत्मविश्वास त्यांचे समर्थक गावकट्ट्यांवर बोलून दाखविताना दिसत आहेत. लवकरच ग्रामीणचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीणचा आमदार होण्यासाठी भिसे घराणे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिसणार आहे.