दिघोरी (Bhandara):- लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव जंगलात दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी एका पोत्यात महिलेचा सांगाडा आढळून आला होता. यामुळे मोठी खडबड उडाली होती. उलट-सुलट चर्चांना उधाण आले असतांना घटनेचा उलगडा लावण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर होते. अखेर तपासाची चक्रे वेगाने फिरवून दिघोरी/मोठी येथील चित्रलेखा उर्फ रेखा अरुण वासनिक (४५), या महिलेचा सांगाडा असल्याचे समजताच दिघोरी पोलिसांनी संशयित मुलगा सुमित वासनिक (२५) याला ताब्यात घेतले. पोलिसांकडून संशयिताची कसून चौकशी केली जात आहे.
संशयित मुलगा पोलिसांच्या ताब्यात
साकोली-लाखांदूर मार्गावरील दांडेगाव जंगलात कालव्याच्या बाजूला एका प्लास्टिक पोत्यात महिलेचा सांगाडा व साडी आढळून आली होती. जनावरे चारणार्या गुराख्यांना दिसून आले. याची माहिती पोलीस पाटलांकरवी दिघोरी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस (Police)अधिकार्यांसह दिघोरी पोलिसांचा पथक घटनास्थळी दाखल झाला. जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपासाबाबत निर्देश दिले. अखेर दिघोरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित सदर घटनेचा अवघ्या काही तासात छळा लावला. अर्जुनी/मोर तालुक्यातील बोडदे येथील चित्रलेखा उर्फ रेखा अरुण वासनिक ही सन १९९८ मध्ये पतीला सोडून भावाच्या सहाय्याने दिघोरी मोठी येथे आली होती. भावाच्या घराच्या बाजूला झोपडीत आई व मुलगा सुमित हे दोघेही राहत होते. सुमित हा आईशी नेहमी भांडण करीत होता. दि.५ मे २०२४ रोजी त्याने रोजच्या भांडणाच्य कारणावरुन आईची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतक (deceased) हिचे प्रेत प्लास्टिक पोत्यात भरुन दांडेगाव जंगलात नेऊन फेकले होते.
प्रेत दांडेगाव जंगलात फेकल्याचा दाट संशय बळावल्याने पोलिसांनी सुमित याला ताब्यात घेऊन चौकशी केली
दि.६ मे रोजी आई बेपत्ता असल्याची तक्रार दिघोरी पोलीसात दाखल केली होती. संशयित मुलगा समित हा ड्रायवर(driver) म्हणून काम करीत असतांना मागील पाच-सहा महिन्याअगोदर दुचाकी चोरल्याच्या तक्रारी दाखल होत्या. मुलानेच आईची हत्या (Murder)रुन प्रेत दांडेगाव जंगलात फेकल्याचा दाट संशय बळावल्याने पोलिसांनी सुमित याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. मृतकाची वहिणी सीमा मेश्राम रा.दिघोरी मोठी हिच्या तक्रारीवरुन दिघोरी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत. पोलिसांनी या घटनेबाबत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.