तुमसर(Bhandara):- दुचाकित इंधन भरून कामावर जाणार्या दुचाकीस्वाराला रेतीच्या भरधाव टीप्परने (Tipper) उडविले. त्यात दुचाकीस्वाराच्या घटनास्थळीच मृत्यू (Death)झाला. सदर अपघात दि.१५ ऑक्टोबरला ६.३० वाजतादरम्यान शहरातील खापा टोली परिसरात तुमसर-भंडारा या मार्गावर घडला. प्यारेलाल कूमावत (३२), जि.सीक्कर, राजस्थान, असे अपघातातील मृताचे नाव आहे. अपघातानंतर टिप्पर चालक पसार झाला.
तुमसर बस स्थानकाजवळील घटना
मृतक आपल्या दुचाकी क्र. एम. एच. ३६ एम. ६९८६ ने पेट्रोल भरून भंडाराच्या दिशेने जाण्याकरीता निघाला होता. त्याच दिशेने रेतीचा टीप्पर क्र. एम. एच. ३६ एफ. ३२६५ ने दुचाकीस्वार प्यारेलाल कूमावत याला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दुचाकीस्वाराच्या मेंदूला जबर मार बसल्याने मोठा रक्तस्त्राव (Bleeding) झाला. अपघातानंतर टीप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह (Dead-Body)उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. तुमसर पोलीस पुढील तपास करीत आहे.
शहरातून सर्रास जड वाहतूक
मृतक हा शहरातील एका मार्बल दुकानात मजूर होता. कामाच्या ठिकाणी जाण्यास तो निघाला असता घडलेल्या अपघाताने (accident)स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरातून रेतीचे अवजड वाहतूक सर्रास सुरू आहे. वाहनांची अनियंत्रित गती, जीव मुठीत ठेऊन प्रवास करणारे स्थानिक, पोलिसांच्या वाहतूक शाखेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. शहराच्या मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या दुचाकीस्वाराच्या अपघाताने अनेक प्रश्न निर्माण केले आहे.
अवैध वाहनतळाला पोलिसांचे अभय
जुन्या बसस्थानक परिसरापासून ते राजाराम लॉनपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल्स, पान टपरी, व्यावसायिक सदनिका, छोटे व्यापार लागून आहेत. यादरम्यान चक्क रस्त्याला धरून वाहनांची अवैध पार्किंग (Illegal parking)केली जाते. येथे कारवाईच्या नावाखाली वाहतूक पोलीस फक्त हितसंबंध जोपासण्याचे कर्तव्य बजावतात. निर्जन रस्त्यावर घडलेल्या अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुमसर शहराला अजूनही बायपास रस्ता मिळाला नाही. त्यामुळे शहराच्या मध्यभागातून जड वाहतूक सर्रास सुरू आहे. दुर्गा देवी विसर्जनाच्या वेळी सायंकाळच्या सुमारास जड वाहतूक येथे सुरू होती. ट्रक अनियंत्रित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस प्रशासनाने सणासुदीच्या दिवसात अलर्ट राहण्याची गरज आहे.