कारंजा(Washim):- संशयापायी पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide)केली. त्यापाठोपाठ तिच्या पतीनेही २२ जुलै रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यामुळे १७ दिवसांच्या अंतरात एका हसत्याखेळत्या कुटुंबाची वाताहत होवून मुलामुलींच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हरवले आहे.
मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले
कारंजा येथील मंगरूळवेश परिसरातील पंचशील नगरमधील रहिवासी जया लक्ष्मण निवाळे या विवाहित महिलेने पतीवरील संशयातून विष (poison) प्राशन केले होते. नागपूर(Nagpur) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान ६ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. कुटुंबावर या घटनेचे दुःख कायम असतानाच मृतक महिलेचा पती लक्ष्मण माणिकराव निवाळे (४२) यांनीही २२ जुलै रोजी घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे अवघ्या १७ दिवसांच्या कालावधीत निवाळे कुटुंबात दोघांचा मृत्यू होवून कुटुंबाची वाताहत झाली. दरम्यान, मृतक जया व लक्ष्मण यांच्या पश्चात एक अंदाजे १७ ते १८ वर्षीय मुलगी व १५ वर्ष वयाचा एक मुलगा आहे. आई – वडिलांनी एकापाठोपाठ अकाली जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एका मुलीचा महिला हत्याकांडात सहभाग
जया व लक्ष्मण निवाळे यांना एकूण तीन अपत्य आहेत. त्यापैकी मोठी मुलगी पायल कांबळे हिचा विवाह झालेला आहे. २१ जुलै रोजी शहरात झालेल्या महिला हत्याकांडात तिचा आरोपी म्हणून समावेश आहे. तिने आपल्या मावशीसोबत मिळून गौतम नगरमधील मनिषा कुंभलवार या महिलेचा दगड, विटा मारून खून केला आहे .