काम थांबवा: अगोदर आराखडा जाहीर करा, अन्यथा आंदोलन-राष्ट्रवादीचा इशारा
उदगीर (Udgir Drains) : उदगीर शहरात कोणत्या भागात अंडरग्राउंड नालीचे काम होणार आहे, याचा आराखडा अगोदर उदगीर नगरपालिकेने जाहीर करावा आणि मगच अंडरग्राउंड नाल्यांचे काम करावे, अशी मागणी करीत (Udgir Drains) अंडरग्राउंड नाली कामातून नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालविण्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. १६२ कोटी रुपये खर्चाचे पहिल्या टप्यातील २७ डिसेंबर २०२४ पासून सुरू झालेले काम थांबवा, अशी मागणी करीत हे काम न थांबल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा पक्षाने उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे केली आहे.
उदगीर न. प. अंतर्गत नाली आणि रोडसाठी दलित वस्ती, नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण तसेच वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून त्या कामांना सुरूवात झाली आहे. काही कामाच्या कार्यारंभ होत आहेत. परंतु, त्याचबरोबर शहरामध्ये वॉटर ग्रीड, (Udgir Drains) अंडरग्राउंड नालीचे काम पण चालू झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोड फुटणार आहेत. याची जाणीव कदाचित न.प. च्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना झाली नसावी.
कारण न.प. उदगीर यांनी अंडरग्राउंड नालीचे काम कोणत्या भागात किती किमी आहे किंवा शहराच्या कोणत्या भागात (Udgir Drains) अंडरग्राउंड नाली होणार आहे, याचा आराखडा न.प. ने जाहीर केला नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात शहरात नवीन कामे चालू केली जात आहेत. त्यामुळे आलेला निधीचा मोठ्या प्रमाणात संबंधित अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. यामुळे सरकारी पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे संबंधीत सर्व नवीन कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
सरकारच्या पैशाचा दुरुपयोग थांबवा!
अंडरग्राउंड नाली (Udgir Drains) बांधकामास स्थगिती देऊन सरकारच्या पैशाचा दुरुपयोग थांबविण्यात यावा, अन्यथा रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांच्यासह धनाजी बनसोडे, संदीपान कदम, नामदेव भोसले, रत्नदीप कांबळे, प्रेम तोगरे, अभिनव गायकवाड, केशव कांबळे, माधव उदगीरकर आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. काल सोमवारी (दि.२४) हे निवेदन पक्षाने दिले.