अंजनगाव सुर्जी(Amrawati):- रेल्वे विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन तब्बल सतरा व्यक्तीकडून एकूण एक कोटी छप्पन लक्ष रुपये हडपल्याची तक्रार मंगळवारी (दि. १४) ला अंजनगावसुर्जी पोलिसस्टेशनमध्ये (Police Station) झाली असून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू
अकोट येथील फिर्यादी मंगेश वसंतराव हेंड (३८) रा. रामटेकपुरा अकोट यांच्या तक्रारीनुसार मंगेश यांची येथील योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार यांच्यासोबत डिसेंबर २०२१ ला ओळख झाली. मुन्ना इसोकार त्यांनी मला म्हटल्यानुसार तुला रेल्वे डिपार्टमेंटला (Railway Department) नोकरीवर लावून देतो. त्याकरिता तुला पैसे खर्च करावे लागतील, पण सोबत एकूण दहा ते पंधरा कैंडिडेट्स लागतील. प्रत्येकाला दहा लक्ष रुपये खर्च येणार असून तो तुम्हाला खर्च करावा लागेल, अशी बातावणी केली. त्यानुसार मंगेशने आकोट येथील त्याचे काही नातेवाईक व इतर मित्र परिवारातील लोकांना याबाबत सांगितले व त्यानुसार मुन्ना इसोकार यांच्यासोबत व्यवहार सुरू झाला.
सर्वांना पत्त्यावर जॉइनिंग लेटर घरी पोस्टाने पाठवले
त्यानंतर २३ जानेवारी २०२२ ला मुन्ना इसोकार यांनी अंजनगाव येथे माझ्यासह इतर १७ लोकांना बोलावले व एका फ्लॅटवर नेऊन श्रीकांत बाबुराव फुलसावंदे रा. राजुरा, विलास गोवर्धन जाधव रा. परतवाडा, मॉन्टी ऊर्फ मेघराज सिंग चव्हाण ठाकूर रा. मसाजगंज अमरावती यांच्यासोबत रेल्वे अधिकारी म्हणून भेट घालून दिली. मंगेश हेंड ९ लक्ष, जोशना हेंड ५ लक्ष, पवन ताळे १० लक्ष, मयूर नेमाडे ९ लक्ष ५० हजार, विजय दातीर ९ लक्ष, गणेश रेखाते १० लक्ष, प्रल्हादथोरात १० लक्ष, आदित्य पाकधुणे १० लक्ष, अक्षय लोणारे १० लक्ष, प्रशांत लाडोळे १० लक्ष, दिनेश सावरकर १० लक्ष, निलेश बोडखे १५ लक्ष, सतीश वडाळे १० लक्ष, सूरज हटवार ८ लक्ष, सुनिता इंगळे १० लक्ष, महेंद्र पाखरे ६ लक्ष, आशिषधर्माळे ३ लक्ष, गव्हाळे २ लक्ष ५० हजार असे एकूण एक कोटी ५६ लक्ष रुपये या सर्व कैंडिडेट्सनी योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार यांच्यामार्फत नगदी व बँक खात्यामध्ये दिले. मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव, मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंग चव्हाण यांनी सर्वांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही. आम्ही तुमची ऑर्डर काढतो. सर्वांना पत्त्यावर जॉइनिंग लेटर घरी पोस्टाने पाठवले.
तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, अशी धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आली
त्यानुसार सर्व मुंबई येथे जॉइनिंगकरिता गेले असता तेथे अधिकारी हजर आहे, असे सांगून टाळाटाळ करून जे अधिकारी जॉईन करून घेणार आहेत, तेसुद्धा सुट्टीवर गेले आहेत. मुन्ना इसोकार यांनी रेल्वेचे खोटे अधिकारी म्हणून श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव यांची रेल्वेचे अधिकारी म्हणून भेट घालून दिली व फसवणूक(Fraud) केल्याचे लक्षात आले. त्यानुसार इतर तीन लोकांना सर्व कॅन्डीडेट भेटण्याकरिता गेले असता त्यांनी तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, अशी धमकी देऊन शिवीगाळ(Abusing) करण्यात आली व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. अशा प्रकारची तक्रार अंजनगाव पोलिसांत देण्यात आली. याप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी योगेश ऊर्फ मुच्चा इसोकार रा. अंजनगाव सुर्जी, श्रीकांत फुलसावंदे रा. राजुरा ता.जि अमरावती, विलास जाधव रा. परतवाडा, मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर रा. मसानगंज अमरावती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.