तुमसर तालुक्यातील वाहनी येथील घटना
हरदोली/सिहोरा (ST bus Accident) : तुमसर तालुक्यातील सिहोरा जवळील वाहनी येथे दि.१६ मार्च २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान अपघात घडला. पती-पत्नीसह दोन मुलांना घेऊन चिखला येथे जात असतांना गाडी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार खाली कोसळले. यात पती व दोन मुले रस्त्याच्या बाजूला तर पत्नी रस्त्यावर कोसळली. त्यादरम्यान मार्गावरुन जाणार्या (ST bus Accident) एसटी बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच गतप्राण झाली. मीना ओमेश्वर कडू (३२) रा.चिखला, असे मृत महिलेचे नाव आहे.
पतीसह दोन मुले सुदैवाने बचावले
तुमसर तालुक्यातील चिखला येथील ओमेश्वर कडू हा पत्नी मीना व दोन मुलांना घेऊन मोटारसायकल क्र.एमएच ३६ ए ४०१ या गाडीने तिरोडा तालुक्यातील सरांडी येथून आपल्या स्वगावी जाण्यासाठी निघाले. गावाकडे जात असतांना वाहनी येथील पाण्याच्या टाकीजवळ सिहोराकडून जाणारी (ST bus Accident) एसटी बस क्र.एमएच ०६ एस ८८६० समोरुन येतांना दिसून आल्याने दुचाकीस्वार ओमेश्वर कडू याने मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला घेत असतांना मोटारसायकल शेणावरुन गेली. त्यात मोटारसायकल स्लीप झाली. त्यामुळे ओमेश्वर कडू व दोन मुले हे रस्त्याच्या डाव्याबाजूला पडले. तर पत्नी मीना ही रस्त्यावर पडली. त्यात तिच्या डोक्यावरुन एसटीचे चाक गेल्याने अक्षरश: डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती सिहोरा पोलिसांना मिळताच ठाणेदार विजय कसोधन यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. मीना कडू हिच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या (ST bus Accident) अपघातात पतीसह दोन्ही मुले सुदैवाने बचावले. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोउपनि हरिदास सुरपाम करीत आहेत. निलकंठ मेश्राम (३२) रा.कारुटोला जि.गोंदिया, असे बसचालकाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.