हिंगोली (जिमाका/Hingoli) :- जिल्हा एड्स (Aids)प्रतिबंध व नियंत्रण विभागाने एड्स आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी त्रैमासिक बैठकीत घेतला कामकाजाचा आढावा
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर. मगर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा सरकारी कामगार विभागाचे श्री. ढगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, श्रीमती पुंडगे, श्रीमती पाईकराव, ‘डापकू’चे संजय पवार, श्रीमती टिना कुंदनाणी, आशिष पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे – श्री. गोयल
जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करुन पुरेसा रक्तसाठा तयार ठेवावा, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. सर्व गरोदर माताची नियमित एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी करावी. तसेच हिपॅटायटीसचे लसीकरण सर्व अती जोखीम गटातील व्यक्तींना करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुरेसा लशींचा साठा व एचआयव्ही आणि एसटीआय किट उपलब्ध ठेवण्यास सांगितले. तसेच एआरटी सेंटर येथे शिबिराचे आयोजन करुन एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे आयुष्यमान भारत कार्ड काढावेत, अशा सूचनाही श्री. गोयल यांनी यावेळी केल्या. जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर करताना म्हणाले, हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत एकूण 4228 सामान्य गटातील रुग्णांची व 280 गरोदर स्त्रियांची नोंद झाली असून, एकूण 3989 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली आहे. त्यापैकी 1969 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत.
एकूण 33 हजार 376 व्यक्तींची तपासणी
तसेच एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत एकूण 33 हजार 376 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 71 एचआयव्ही (HIV) संसर्गित आढळून आले आहेत. तर 24 हजार 661 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 नवीन व 9 यापूर्वीच एचआयव्ही संसर्गित रुग्ण असल्याचे आढळून आले आहेत. तसेच एचआयव्ही संसर्गित महिलांच्या 10 मुलांचे 18 महिन्यानंतरचे तपासणी अहवाल हे निगेटिव्ह (negative) आढळून आले आहेत, अशी माहिती दिली. तसेच त्यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहितीही दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर शेवटी श्री. चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.