चोरीच्या घटनांनी व्यापारी धास्तावले
परभणीतील पाथरी तालुक्यातील घटना
परभणी/पाथरी (Pathari Bazar Samiti) : पाथरी शहरातील बाजार समिती आवारातील दोन आडत दुकानातील आलमारीचे लॉक तोडून चोरट्यांनी रोख रक्कमेवर हाथ मारल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील बाजार समितीच्या आवारात असलेल्या आडत दुकानात गेल्या तीन महिन्यात सहा दुकानात चोरीच्या घटना घडल्या असून त्या अद्यापही सुरूच आहेत. गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी रात्री मोंढ्यात दोन दुकानात चोरीच्या घटना घडल्या.
पहिल्या घटनेत थावरे ट्रेडिंग कंपनीच्या छतावरुन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व दुकानातील आलमारी उचलून गोदामात नेली व लॉक तोडून नगदी रक्कम लांबविली. यानंतर बाजूच्याच हनुमान आसाराम थावरे यांच्या भुसार दुकानात प्रवेश करून आलमारीचे लॉक तोडून चोरट्यांनी हाथ साफ केला.
तर तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी पूजा ट्रेडिंग कंपनी या दुकानाचा दरवाजा वाकवला व दुकानात प्रवेश केला यावेळी त्या ठिकाणी झोपलेला व्यक्ती जागा झाला व त्याने बाजूला असलेला रिकामा डब्बा चोरांना फेकून मारला या वेळी चोरटे पळून गेले. दरम्यान शुक्रवारी व्यापाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. नियमित होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने नंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे.