कारंजा(Washim):- शकुंतलेचा जवळपास 20 फूट अंतराचा रेल्वे मार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार कारंजा शहरात 18 मे रोजी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, रेल्वे विभाग (Railway Department) मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.अशा आशयाचे वृत्त दैनिक देशोन्नतीने (Dainik Deshonnati) 19 मे च्या अंकात अग्रक्रमाने प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत मूर्तिजापूर आर.पी.एफ.ने या प्रकरणी 20 मे रोजी गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
रेल्वे मार्गाचे 14 लोखंडी स्लीपर चोरी
या संदर्भात आर. पी. एफ.(RPF) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील डोंगरे यांनी फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्यांनी कारंजा शहरातील मुस्लिम कब्रस्ताना जवळील शकुंतलेचा जवळपास 20 फुटाचे रेल्वेरूळ कापून बाजूला केले आणि त्याखालील अंदाजे 8 हजार रुपये किमतीचे 4 क्विंटल 20 किलो वजनाचे शकुंतला रेल्वे मार्गाचे 14 लोखंडी स्लीपर (Iron sleeper) चोरून नेले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मुर्तीजापुर आर. पी. एफ. ने अज्ञाता विरुद्ध आर. पी. यु. पी. ॲक्ट 1966 प्रमाणे कलम 3 (ए) नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास आर. पी .एफ. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील डोंगरे करीत आहेत.