बुलढाणा (MLA Manoj Kayande) : “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा..” डोंगा म्हणजे वाकडा-तिकडा. ऊस दिसतांना जरी वाकडा-तिकडा दिसत असलातरी, त्याचा रस मात्र गोडच असतो. म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये, फसू नये.. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण. ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण फशी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही, आपले मीलन होणार नाही.. असं जीवनाचे तत्त्वज्ञान एका साध्या अभंगातून देणारे संत चोखामेळा, त्यांच्या जयंतीचा योगायोगही पहा.. तिथी आणि तारीख तीच १४ जानेवारी, म्हणजे जन्मत: हा संत निर्विवाद राहिला.
पायरीशी दंग होऊन राहिलेल्या संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव (Birth of Saint Chokhamela), त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे मेहुणा राजा येथे दरवर्षी १४ जानेवारीला साजरा होतो. ही परंपरा सुरू केली होती, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सन २००० मध्ये. त्यामुळे सार्वजनिक जन्मोत्सव सोहळ्याचे हे २५ वे अर्थात रौप्य महोत्सवी वर्षे होते.
महाराष्ट्र ही संताची भूमि असून, याच जन्म भूमित १२व्या शतकात विठुरायांचे भक्त संत चोखमेळा (Birth of Saint Chokhamela) यांचा जन्म १४ जानेवारी १२६८ ला महाराष्ट्राच्या मेहुनाराजा जन्मभूमित झाला. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या सर्व महान थोर संतानी चांगली शिकवण दिली. अशा महान संत चोखमेळा यांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी १०० टक्के विकास निधी कमी पडू देणार नाही, मात्र जोपर्यंत लोकांच्या मनात संत चोखा येणार नाही.. तोपर्यंत जन्मस्थळाचा विकास आणि लोकोत्सव होणार नसल्याचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी संत चोखमेळा यांच्या ७५७ व्या जयंती उत्सवानिमित्त बोलतांना सांगितले.
कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व हर्षवर्धन सपकाळ,माजी आमदार तोताराम कांयदे, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, संत चोखा नामप्रवर्तक प्रा.कमलेश खिल्लारे, माजी जि.प.सदस्य बाबूराव नागरे, गंगाधर जाधव, प्रा राजेंद्र डोईफोडे, दादाराव खार्डे, संतोष खांडेभराड, डी टी शिंपणे, राजेंद्र चित्ते, प्रवीण गीते, भगवान मुंडे, प्रा. दिलीप सानप प्रकाश गीते, नंदा बोंद्रे, गणेश डोईफोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आ. मनोज कायंदे (MLA Manoj Kayande) यांनी सांगितले की, उपेक्षित असणारे हे संतांचे ठिकाण अपेक्षित व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले आहे. त्याला यश आले असून येणारा जन्मोत्सव हा आपल्याला वेगळा जन्मोत्सव दिसेल. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलताना सांगितले की, संत चोखामेळा यांचा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी मात्र तो होऊ शकला नाही. याला लोकसहभाग आणि प्रशासनाची कमतरता दिसून येत आहे. मात्र मतदारसंघात आता ‘नवा गडी नवा राज’ आला असल्याने येणाऱ्या काळात नक्कीच या ठिकाणची परिस्थिती बदललेली दिसेल.
तर संत चोखामेळा अभ्यासक प्रा कमलेश खिल्लारे यांनी आपापसांतील मतभेद, मतभेद बाजूला ठेवून या जन्मस्थळ विकासासाठी एकत्र यावे. लोकसहभाग आणि प्रशासन एकत्र आले तर नक्कीच याठिकाणी इतर पर्यटकांची ओढ या ठिकाणी वाढेल. आपल्या परिसरात संत चोखामेळा यांचा जन्मस्थळ असल्याचा अभिमान आपल्याला असायला हवा, असेही प्रा. कमलेश खिल्लारे यांनी बोलताना सांगितले. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, बाबुराव नागरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुकेश माहूर यांनी तर सूत्रसंचालन व्ही एस जाधव सर यांनी केले.
बार्टीचे उपकेंद्र मेव्हणाराजा येथे सुरू करण्याचा प्रयत्न
अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन या ठिकाणी केवळ इमारती बांधून या जन्मस्थळाचा विकास करून उपयोग नाहीतर या ठिकाणी बार्टीचे उपकेंद्र उभारून या ठिकाणी ग्रंथालय व अभ्यासिका त्यासाठी लागणारे ग्रंथपाल विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वस्तीगृह उभारून या ठिकाण विकास अपेक्षित असल्याचे आ. मनोज कायंदे (MLA Manoj Kayande) यांनी सांगितले.
पुढील जन्मोत्सव तीन दिवसीय
दरवर्षी 14 जानेवारी आली की परिसरातील नागरिकांना आणि प्रशासनाला संत चोखामेळा यांची आठवण होते दरवर्षी सक्तीचे भक्त बोलून हा जन्मोत्सव साजराही केला जातो, मात्र लोकोत्सव हवा यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार असून पुढील वर्षी होणारा जन्मोत्सव हा तीन दिवसाचा करण्याचा प्रयत्न करणार आहे.. यासाठी समाजाचे प्रबोधन करणारे अनेक मान्यवरांना निमंत्रण करून हा हा आगळावेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आ. कायदे (MLA Manoj Kayande) यांनी सांगितले.