परभणी/गंगाखेड(Parbhani):- शहरात नगर परिषदेच्या हद्दीत मोकाट जनावरांसह डुकरांनी (Pigs) चांगलाच उच्छाद मांडला असुन या मोकाट डूकरांमुळे झालेल्या अपघातात(Accident) अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नगर परिषद प्रशासन मात्र याकडे गांभीऱ्याने केंव्हा लक्ष देणार ? असा संतप्त सवाल जखमी झालेले दुचाकीस्वारांतून उपस्थित केला जात आहे.
गंगाखेड नगर परिषद प्रशासन बंदोबस्त करणार का ?
गंगाखेड शहरातील मुख्य बाजार पेठेसह मुख्य रस्ते, गल्ली, बोळात व शासकीय कार्यालय परिसरात मोकाट कुत्रे व जनावरांनी उच्छाद मांडला होता. पण आता या जनावरांच्या जोडीत डुकरांचा भर पडला आहे. शहरात मोठ्या संख्येने वाढलेल्या डुकरांनी तर कहरच केला असल्याचे नगर परिषद कार्यालयाच्या आवारासह पोलीस ठाणे परिसर, उपविभागीय अधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय परिसर तसेच बस स्थानक(Bus Station), रेल्वे स्टेशन(Railway station) परिसरात ही मोकाट डुकरे फेरफटका मारताना दिसत आहे.
डुकरांमुळे दोघे दुचाकीवरून पडुन जखमी
शहरातील मुख्य रस्त्यावरही या डुकरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत असुन रस्त्यावर फिरणारे मोकाट डुकर अचानक दुचाकीसमोर आल्यामुळे गेल्या आठवड्यात दुचाकीचा अपघात होऊन राजाभाऊ वैजनाथराव गायवळ रा. खादगाव हे दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना ताजी असतांनाच सोमवार २ डिसेंबर रोजी प्रा. अंकुश वाघमारे यांच्या बुलेट दुचाकीसमोर अचानक डुकर आल्याने झालेल्या अपघातात प्रा. अंकुश वाघमारे व भारत गायकवाड हे दोघे ही दुचाकीवरून पडुन जखमी झाले आहे.
त्यांच्या हाता पायाला मार लागला असुन नगर परिषद प्रशासन शहरात व मुख्य रस्त्यावर झुंडीने फिरणाऱ्या डुक्कर व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार का? असा संतप्त सवाल जखमी झालेल्या दुचाकी चालकांतून उपस्थित केला जात आहे.