परभणी (Parbhani):- जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात पाच विद्यमान आमदारासह तीन माजी आमदार निवडणूक (Elections) लढवत आहेत. पाचही आमदार निवडून आल्यानंतर आपला मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचा दावा करत आहेत. शिवाय मतदारातही चर्चा होत आहे. त्यामुळे मतदार कुणाला निवडून देणार आणि मंत्रिमंडळात कुणीची वर्णी लागणार या चर्चेने गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण तापत आहे.
चारही मतदार संघात होणार चुरशीच्या लढती
परभणी जिल्ह्यातील जिंतूर – सेलू, परभणी, पाथरी आणि गंगाखेड या विधानसभा मतदार संघात निवडणूक सुरु आहे. परभणी विधानसभेत उबाठाचे आ.डॉ. राहूल पाटील तिसर्यांदा नशीब आजमावत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आनंद भरोसे कडवे आव्हान देत आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि मंत्रीमंडळात आ.डॉ. पाटील यांची मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याची चर्चा आमदार समर्थकांसह मतदारात सुरु आहे. तर जिंतूर – सेलू विधानसभा मतदार संघात भाजपा उमेदवार आ. मेघनाताई बोर्डीकर दुसर्यांदा निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar)गटाचे माजी आ. विजय भांबळे, वंचितचे सुरेश नागरे यांनी प्रचारात चुरस घेतल्याने तिरंगी लढत होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले तर मेघनाताई बोर्डीकर हमखास मंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे.
पाच मंत्रिपद जिल्ह्याला मिळणार असल्याची चर्चा होत असताना मतदार कुणाला संधी देणार ?
पाथरी विधानसभा मतदार संघात सर्वात अधिक चुरस आहे. या मतदार संघात विद्यमान सुरेश वरपूडकर, राजेश विटेकर यांच्यासह माजी आ. बाबाजानी दुर्राणी, सईद खान यांच्यात लढत होत आहे. आ. वरपूडकर हे काँग्रेसचे (Congress)जेष्ठ नेते आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना अनेकदा वरपूडकरांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. मात्र आता नक्कीच संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आ. राजेश विटेकर यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार आल्यास त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघात विद्यमान आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासमोर शिवसेनेचे विशाल कदम, माजी आ. सिताराम घनदाट यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. महायुतीचे सरकार आल्यास मंत्रिमंडळात आ. रत्नाकर गुट्टे मित्रपक्ष म्हणून संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पाच पाच मंत्रिपद जिल्ह्याला मिळणार असल्याची चर्चा होत असताना मतदार कुणाला संधी देणार ? हे निकालानंतर स्पष्ट होईल, मात्र सध्या तरी सर्वच मतदार संघात सत्ता कुणाची येणार आणि मंत्रिपद कुणाला मिळणार यावर चर्चा झडत आहे.