योजनेला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
परभणी (Parbhanit Abhay Yojana) : थकीत वीज बिलामुळे वीज कनेक्शन तोडलेल्या वीज ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना आणली होती. या अभय योजनेत १३ कोटी रुपये वसूल झाले आहेत. सदर योजनेला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ग्राहकांसाठी (Abhay Yojana) अभय योजना आहे. घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांनी अभय योजनेतील वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफिच्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निकालानुसार जागेचे मालक किंवा खरेदीदार, ताबेदार यांना वीज बिलाची थकबाकी भरणे बंधनकारक आहे. कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून सवलतीची योजना लागु करण्यात आली आहे.
अभय योजनेचा (Abhay Yojana) कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर असा होता. या कालावधीत थकीत वीज देयक ग्राहकांनी भरले आहे. नांदेड परिमंडळात २ कोटी ५१ लाख रुपये वसूल झाले आहेत. छत्रपती संभाजी नगर, लातूर व नांदेड परिमंडळाने मिळून १३ कोटी रुपये वसूल केले आहेत. वीज ग्राहकांना संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. तसेच टोलफ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल.
मराठवाड्यातील १० लाख २४ हजार ४०० वीज ग्राहकांकडे १ हजार ८७१ कोटी ५१ लाख ५८ हजार रुपये एवढी थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी वीज जोडणी तोडण्या सारखी कारवाई करण्यात येते. अभय योजनेचा (Abhay Yojana) लाभ घेऊन कारवाई पासून वाचता येते. या अभय योजनेत १३ कोटी रुपये वसूल झाले आहेत, अशी माहिती महावितरणने दिली आहे.