कथित शहरी नक्षली संघटनांची नावे जाहीर करण्याचे दिले आव्हान
लातूर(Latur) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत बोलताना डाॕ. बाबासाहेबांचा अपमान केला. ते संसदेत जे बोलले, ते त्यांच्या मनातील बोलले. त्यांच्या मनातील गोष्ट वाचेवर आली आणि ते पकडले गेले. पकडल्यावर सज्जन माणूस माफी मागतो; मात्र हे माफी मागत नाहीत, असा जोरदार पलटवार करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सज्जनपणावर सुप्रसिध्द राजकीय विश्लेषक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते तथा भारत जोडो अभियानचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी शरसंधान साधले. शनिवारी (दि.21) लातूर येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)कथित भारत जोडो अभियानातील शहरी नक्षली संघटनांची नावे जाहीर करावी तसेच कथित काठमांडू बैठकीतील सहभागी व्यक्तींची नावे जाहीर करावीत, असे आव्हान देत ‘ये देश डरनेवाला नही है!’, असा इशारा प्रा. यादव यांनी दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांंच्यावरही केले शरसंधान!
दिवंगत समाजवादी विचारवंत अॅड. मनोहरराव गोमारे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानासाठी प्रा. योगेंद्र यादव लातूरमध्ये आले होते. तत्पूर्वी त्यांनी हॉटेल अंजनी येथे भारत जोडो आंदोलनाच्या अनुषंगाने लातूरमधील विविध क्षेत्रातील बुध्दिवंताशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत (Press conference) बोलताना प्रा. यादव म्हणाले, देशात लोकशाही वाचविण्यासाठी तसेच देशाची संस्कृती आणि विचार व संविधानिक मूल्य रुजविण्यासाठी भारत जोडो अभियान हे अराजकीय संघटन 6 फेब्रुवारी 2023 पासून काम करीत आहे. हिंसेचा प्रतिकार करणारे महात्मा गांधी(Mahatma, राममनोहर लोहिया यांनी सांगितलेल्या मार्गाने काम करणारे हे अभियान आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना शहरी नक्षली संघटन काम करीत असल्याच्या केलेल्या आरोपाचे प्रा. यादव यांनी खंडन केले.
दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या
फडणवीस यांनी त्या नक्षली संघटनांची नावे जाहीर करावी तसेच काठमांडू येथे कोणत्या बॅनरखाली बैठक झाली व त्या बैठकीत सहभागी व्यक्ती यांची नावे ही फडणवीसांनी सार्वजनिक करावी. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असे आव्हान त्यांनी दिले. भीमा कोरेगाव प्रकरण एक षडयंत्र होते तसेच आणखी एक षडयंत्र करण्याची तयारी या राज्यात सुरू असल्याचा आरोप करीत अशा षडयंत्राविरुद्धचे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेस विचारमंचाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नागोराव कुंभार, अॅड. उदय गवारे, प्रा. माधव बावगे, भाई सुभाष लोमटे आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूक महायुतीचा ‘गेम प्लॕन!’
लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचे यश आमचे नव्हते; तसेच विधानसभा निवडणुकीतीलही आमचे नाही. आमची लढाई देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आहे. देशाचे संविधान हे सर्वसामान्यांचे रक्षण करणारे संविधान आहे, ही जाणीव सर्वसामान्यांमध्ये निर्माण करण्याचे काम आम्ही करत आहोत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बेजबाबदार राहिली. अशा स्थितीत महायुतीकडे गेम प्लॕन होता, म्हणून महायुती पुढे गेली. केवळ ईव्हीएम नव्हे; तर या निवडणुकीत मतदार यादीमध्ये केवळ पाच महिन्यांमध्ये 40 लाख नावे वाढली गेली. निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर झाला. दोनशे-पाचशे वरून थेट दोन-पाच हजारांवर पैशांचा वापर झाला. केवळ ईव्हीएम नव्हे, तर निवडणुकीतील अनियमितता या निवडणुकीत गेम चेंजर ठरली. भाजपाने निवडणुकांना विज्ञान बनविले. ईव्हीएमची तपासणी तर झालीच पाहिजे; मात्र निवडणूक आयोग ते टाळत असल्याने जनतेचा संशय अधिक वाढत आहे, असेही ते म्हणाले. कदाचित या भीतीपोटीच निवडणुकीची माहिती सार्वजनिक न करण्याची काळजी घेत कायदा दुरुस्ती संसदेत केली गेली, अशी टीकाही त्यांनी केली.