प्रहार: दिनांक 9जून 2024
लेखक : प्रकाश पोहरे,
संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश.
हा, ना भाजप , ना एनडीए तर अमोशा पक्षच..!
राजा शक्तिशाली होत जातो, तो एकहाती सत्ता राबवतो. मग, त्याला जगाचा कर्ताधर्ता आपणच असल्याची स्वप्ने पडू लागतात. मग, राजाला वाटू लागते की, आपल्याला सगळ्यांनी ‘विधाता’ म्हटले पाहिजे. प्रजेला तसे वाटत असेल, असे नाही. पण राजाच्या भोवती असणारे खुशमस्करी विदूषक त्याला ‘विधाता’ म्हणू लागतात. राजाला ते आवडू लागतात. हे खुशमस्करे सांगतील, तेच राजाला खरे वाटू लागते. आपण राजाच्या कानात कुजबूज केली नाही, तर आपले काय होईल, याची जाणीव खुशमस्कऱ्यांनाही असते. हा सत्तेचा खेळ वर्षानुवर्षे खेळला गेला आहे. पण प्रत्येक वेळी राजाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा पराभव झालेला आहे. जगभरात जितकी मोठी साम्राज्ये होती, त्यांचा अंत अन्य कुठल्या मार्गाने झालेला नाही. मग भारतात तर साम्राज्य उभेही राहिले नसताना, राजाला ‘विधाता’ झाल्याची स्वप्ने का पडू लागली आहेत ?
हे सगळे पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे, नरेंद्र मोदी या एका व्यक्तीने जगाला एक नवा शब्द दिलाय! ‘पुरोगामी’, ‘प्रतिगामी’, ‘संघी’, ‘हिंदुत्ववादी’, ‘कम्युनिस्ट’, ‘मार्क्सिस्ट’ यांच्या जोडीला त्यांनी ‘मोदीस्ट’ असे स्वत:ला ठरवून दिलेय. म्हणजे नेता, पक्ष, तत्त्वज्ञान आणि देश सारे एकाच शब्दात कोंबले गेलेय. पूर्वी चीन कम्युनिस्ट असे, अमेरिका कॅपिटालिस्ट आहे, काही कार्यकर्ते मार्क्सिस्ट होते. आता हा ‘मोदीस्ट’ शब्द भारतीय मतदारांच्या तोंडी घालून मोदी हे अवघ्या देशाला चिटकवू पाहताहेत. अर्थातच, मोदींना हा देश ‘मोदीस्ट भारत’ करायचाय, असे म्हणू या! तसे म्हणायला सबळ कारण हे की, नरेंद्र मोदी स्वत:च स्वत:ला मतदान करण्याची भाषणे करत होते. ना त्यांनी कधी कुणा उमेदवाराचे नाव घेतले, ना भाजपचे, ना एनडीएचे. इतकेच नव्हे तर ‘अब की बार, फिर मोदी सरकार’ अशी त्यांनी स्वतःच घोषणा दिली होती आणि चक्क चारशेचा आकडा गाठण्याची भाषणेदेखील दिली होती. आज बहुमत मिळाले नसल्यामुळे ते १० वर्षांत पहिल्यांदा ‘एनडीए सरकार’ हा शब्द उच्चारताना दिसत असतील, तर हा भाग वेगळा…
२०१४ साली जेव्हा नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आले, तेव्हापासून भाजपाअंतर्गत लोकशाही संपली. एव्हढेच नव्हे तर ‘एनडीए’मधील घटक पक्षांना दबावाखाली आणून ‘मी, माझं आणि माझं’च असा त्यांचा प्रवास होत गेला. आजदेखील मोदींनी एनडीएचे आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून स्वत:च स्वत:ला घोषित केले. खरे म्हणजे पक्षाचे किंवा आघाडी असेल तर त्या आघाडीचे एक संसदीय मंडळ असते. त्या मंडळाने आपल्या प्रमुखाचे नाव सुचवायचे असते. त्यामध्ये इच्छुक उमेदवार स्वतःचे नाव पुढे करीत असतात. नंतर एकमुखाने निवडणूक होत असते. मात्र, या ठिकाणी अशी काही प्रक्रियाच झालेली नाही. या वर्षीची लोकसभा निवडणूक २०१४ आणि २०१९च्या निवडणुकींपेक्षा खूपच वेगळी ठरलेली आहे. पूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत मोदींचा प्रभाव हा सर्वाधिक परिणामकारक घटक ठरलेला होता. आताच्या निवडणुकीत मात्र मोदींचा प्रभाव लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे आढळले. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर यंदा राज्यामध्ये महाविकास आघाडीने ३० जागांवर मुसुंडी मारली आहे. तर महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. राज्यात काँग्रेसने सर्वाधित १३ जागांवर विजय मिळवला आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास इंडिया आघाडीने २३२ जागांपर्यंत मजल मारली. तसेच एनडीएने देशात २९४ जागांवर आघाडी मिळवली आहे. ४०० पार हा नारा अपयशी ठरला आहे. एनडीए जरी आघाडीवर असली तरीही फार कमी फरकाने एनडीएने लीड मिळवलं आहे. सत्ता मिळाली म्हणून यापुढे उतू नका, मातू नका, अन्यथा पुढच्या निवडणुकीत सरळ घरचा रस्ता दाखवू, असं स्पष्टपणे मतदारांनी बजावलं आहे. अर्थात… जनतेने बहुमत हे दिले, ते एनडीएला दिले, एकट्या मोदींना किंवा त्यांच्या भाजपला नाही. मोदी नावाचा हा करिष्माच (?) जनतेने नाकारलेला दिसतो. देश्यात २७ ठिकाणी भाजप उमेदवारांचे डीपॉझिट जप्त झाले आहे, आणि महाराष्ट्रात मोदींच्या ज्या १९ सभा झाल्यात तेथे तेथे एनडीए चे बहुतांश उमेदवार पडले, अपवाद केवळ ३जागांचा, ठाणे-श्रीकांत शिंदे आणि सातारा-उदयन राजे भोसले, पुणे- मोहोळ ह्या तीन जागा कारण त्यांचा व्यक्तिगत करिश्मा कामी आला. नागपूरला गडकरीनी तर सभा घेतलीच नव्हती.
सारासारविवेक शाबूत असलेल्या कोणालाही मोदी पुन्हा सत्तेत येऊ नये, असे वाटत होते. स्वतः मोदी ज्या वाराणसीत उभे होते तेथे सुद्धा मतदारांनी त्यांना जवळपास नाकारले हे त्यांचे मताधिक्य पाहिले तर लक्ष्यात येते. या निवडणुकीत मोदींनी सातत्याने द्वेष पसरवणारी वक्तव्ये केली. मोदी बोलतात एक, करतात वेगळे. उदाहरणार्थ, नोटाबंदीनंतर मुंबईहून, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणांहून जे कष्टकरी लोक पायी चालत दूर, उत्तर प्रदेश, बिहारमधल्या आपापल्या गावी, घरी निघाले, त्यांच्याबद्दल त्यांनी ‘मन की बात’मध्ये अगदी सद्गदित होऊन सहानुभूती व्यक्त केली; पण त्यांचा प्रवास कमी कष्टाचा व्हावा, कमी वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. उलट, उत्तर प्रदेशात जाऊन ‘कोविडची लागण घेऊन येणाऱ्यांना (उद्धव ठाकरे यांच्या) महाराष्ट्र सरकारने अडवलं नाही’, असा आरोप केला! मोदी कधीही चूक कबूल करत नाहीत. शेतकऱ्यांच्या मोर्चावर केवळ अश्रुधूराचे नळकांडेच फोडले नाहीत तर, ऐन हिवाळ्यात थंड पाण्याचे फवारे मारले, त्यांच्या मार्गावर खड्डे केले, अणकुचीदार खिळे पसरले. ७०० चे वर शेतकरी मरण पावलेत मात्र त्याबद्दल माहीत नाही असे मोदी संसदेत सांगतात, त्यामुळे मोदी अहंमन्य आहेत, त्यांना सतत स्वत:वर प्रकाशझोत हवा असतो. सर्व मीडिया त्यांचा उदो उदो करत राहील, अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. हे सगळे देशासाठी घातक आहे. ज्याला लोककल्याण साधायचे आहे, तो कधीही आपली कृत्ये लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. विकासासाठी नियोजन करताना रोजगाराचे, उत्पादनाचे, उद्योगधंद्यांच्या स्थितीचे, शेतीचे-शेतकऱ्यांचे खरे आकडे अत्यावश्यक असतात, हे मोदींना मान्य नाही. खरे तर वास्तव दर्शवणारी आकडेवारी नाकारून देशाची प्रगती साधणे शक्यच नाही. मीडियाने उभ्या केलेल्या भ्रामक प्रतिमेमुळे काही काळ गैरसमज राहील; पण देश अधिकाधिक वाईट स्थितीच्या दिशेने वाटचाल करत राहील. हे ओळखून त्यामुळेच मोदींच्या भाजपला जनतेने बहुमत दिले नाही.
आज जेव्हा राजनाथ सिंह यांनी खुशमस्करी करत नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीएचे आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून मांडला, तेव्हा भाजपतील इतर काही खुशमस्कऱ्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन देत प्रस्तावाला मान्यता दिली. अशावेळी नितीन गडकरी हे उभे सुद्धा राहिले नाहीत, त्या सभेतील व्हिडिओ समोर आले आहेत. त्याचे कारण, नितीनजी हे अटलजी, अडवाणीजी यांच्या भाजपचे आहेत. ते संसदीय लोकशाही प्रणालीला मानतात. आजवर त्यांच्या कर्तृत्वातून आणि स्वभावातूनदेखील त्यांनी ते सिद्ध केलेले आहे. मात्र, मोदींच्या आजच्या मोदी पक्षात खुशमस्कऱ्यांची फौज तयार झालेली दिसते, त्यामुळेच ‘‘राजा बोले, दळ हाले’’, अशी परिस्थिती आज भाजपात(?) दिसून येते.
गेल्या दहा वर्षांत संसदीय लोकशाहीला साजेसे वर्तन मोदी यांच्याकडून घडले नाही, यात कोणताही संशय नाही. लोकशाहीला मुळीच अपेक्षित नसलेला एक वेगळा अजेंडा नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना साथीला घेऊन वापरला. याच काळात सरकार आणि पक्ष या पातळीवरही नरेंद्र मोदी (आणि अर्थातच अमित शहा) यांनी हेच धोरण अवलंबलं. विरोधी पक्षांना तुच्छ लेखण्यात धन्यता मानली जाऊ लागली. लोकशाहीत विरोध हे लोकशाही सुदृढ करणारे हत्यार असते, पण मोदी-पर्वात त्यावर ‘देशद्रोहीपणा’चे शिक्के मारले जाऊ लागले. नरेंद्र मोदी यांचं वर्तन ते जणू या देशाचे सर्वेसर्वा आहेत असं होत गेलं. स्वत:ला ईश्वराचा अंश मानण्यापर्यंत मोदी यांनी मजल मारली. २०१४ सालापासून भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप, असे समीकरण राहिले आहे. नव्हे, ते दिवसेंदिवस जास्त जास्त पक्के होत चालले आहे. अगोदर ‘अब की बार मोदी सरकार’ असे होते. तिथून ‘मोदी की गॅरंटी’ ते मोदी म्हणजे साक्षात देवाचा अवतार, इथपर्यंत प्रवास झाला आहे. आणि आता तर मोदी स्वत:च ‘मला ईश्वराने काही हेतू मनात धरून इथे पाठवलं आहे, माझं काम अजून बाकी आहे, ते पूर्ण होईपर्यंत माझी सत्ता राहील,’ असे म्हणू लागले होते.
सध्याच्या घडीला नरेंद्र मोदी हे दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू किंगमेकर म्हणून समोर आले आहेत. एनडीएला ५४३ पैकी २९३ जागा मिळाल्या, तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळू शकल्या. भाजपला २४० जागांसह बहुमत मिळाले, परंतु २७२ च्या जादुई आकड्याला ते स्पर्श करू शकले नाहीत, ज्याच्या भरवशावर ते एकट्याने सरकार बनवू शकतील. भाजपसह संपूर्ण एनडीए सध्या आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्ष आणि बिहारच्या जनता दल (युनायटेड) वर अवलंबून आहे. मात्र, यात एक प्रश्न उपस्थित होतो. ‘स्वयंभू’ नरेंद्र मोदी आघाडी सरकार कसे चालवणार? दहा वर्षांची कारकीर्द पाहता, ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’, अशी प्रवृत्ती असलेल्या मोदींसोबत टीडीपी आणि जेडीयू हे दोन्ही पक्ष टिकूच शकणार नाहीत. मोदींना गेल्या दहा वर्षांमध्ये सत्ता कोणा नेत्याशी वा पक्षाशी विभागावी लागली नव्हती. ‘एनडीए’ सरकारची ओळख मोदींचे सरकार अशीच होती. आता मात्र, मोदींना आघाडीचे सरकार चालवावे लागेल, पण त्यांचा स्वभाव लक्षात घेता, हे सपशेल कठीण वाटते. कारण अ दानीच्या इशाऱ्यावर, मो दींच्या चेहऱ्यावर आणि शा हांच्या मार्फत चालणारा.
हा, ना भाजप , ना एनडीए तर हा आहे अमोशा पक्ष !!! त्यामुळे हे सरकार फार दिवस टिकणारे नाही, लवकरच सत्ता ही इंडिया आघाडीचीच येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे..!
लोकशाही ही केवळ आणि केवळ मजबूत विरोधी पक्षावरच टिकून असते आणि देश्यात आता कुठे खरी लोकशाही सुरू झाली आहे. त्यामुळे सध्यातरी ‘वेट अँड वॉच’.
प्रतिक्रियांकरिता:
9822593921 वर थेट प्रकाश पोहरेना कॉल करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सॲप वर पाठवा.
प्रतिक्रिया देतांना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.