शिक्षकाने शिकविण्यास दिला नकार… तरी जिद्दीने बनला ‘महान शास्त्रज्ञ!
थॉमस अल्वा एडिसन (Thomas Alva Edison) : बल्बचा शोध लावून जगातून अंधार दूर करणारे ‘थॉमस अल्वा एडिसन’ यांचे नाव इतिहासातील महान शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? एक काळ असा होता, जेव्हा त्याचे शिक्षक त्याला मूर्ख आणि वेडा म्हणायचे. एवढेच नाही तर शिक्षकाने एडिसनला शाळेत शिकवण्याची परवानगी देण्यासही नकार दिला होता. अशा परिस्थितीत, तो मूर्खातून महान शास्त्रज्ञ (Scientist) कसा बनला. हा मोठा प्रश्न आहे. जाणून घ्या एडिसनची कहाणी.!
एडिसनची कहाणी, ज्यामध्ये त्यांच्या आईने बजावली महत्त्वाची भूमिका..!
एडिसनला घडवण्यात त्यांच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत, ज्यातून आपण काहीतरी शिकू शकतो. एके दिवशी, आईला रडताना पाहून एडिसनने विचारले, ‘आई या कागदावर काय लिहिले आहे आणि तू का रडत आहेस?’ यावर त्याचा आईने (Mother) उत्तर दिले की, शिक्षकांनी लिहिले आहे, ‘तुमचा मुलगा खूप हुशार आहे.’ आमच्या शाळा आणि शिक्षकांची गुणवत्ता निकृष्ट आहे. म्हणूनच, आम्ही तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलाला स्वतः शिकवले तर बरे होईल. त्याच्या आईच्या मिठीत राहून तो वाचायला, लिहायला आणि अंकगणिताच्या (Arithmetic) मूलभूत गोष्टी शिकला, पण कुतूहल ही त्यांची सर्वात मोठी आवड होती आणि आईकडून जे काही एडिसन शिकला, त्यावर तो समाधानी नव्हताच, उलट त्याचा पाठपुरावा करत राहिला.
ज्याने रात्रीच्या अंधारात प्रकाश आणला…
अमेरिकन संशोधक, ग्रामोफोन, बल्ब, वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे पसरविणारे विद्युत् जनित्र, चलच्चित्रपट प्रक्षेपक (Cinema Projector), प्रत्याभरण (Charging) करता येणारी विद्युत् संचायक घटमाला (Battery), पहिला बोलका चित्रपट, बेंझीन व कार्बोलिक अम्लाची निर्मिती यांसाठी, एडिसन ओळखले जातात.
एडिसनच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे, एडिसनने सुमारे 1093 शोधांचे पेटंट मिळवले, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध शोध बल्बचा (Bulb Invention) होता. आजही जगात नवीन प्रकारचे बल्ब उपलब्ध आहेत. पण पहिला टंगस्टन-ग्लास बल्ब 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस अल्वा एडिसनने तयार केला होता, ज्याने रात्रीच्या अंधारात प्रकाश आणला.
छपाई यंत्राशी खटपट आणि प्रयोग करायला सुरुवात…
एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी अमेरिकेच्या ओहायओ प्रांतातील मिलान (Milan) या गावी झाला. मिशिगन राज्यातील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत ते तीन महिनेच शिकले. बारा वर्षांचे असताना, त्यांनी ग्रँड ट्रंक रेल्वेवर वर्तमानपत्र विकताना, छपाई यंत्राशी (Printing Machine) खटपट व प्रयोग करायला सुरुवात केली. वयाच्या 15 व्या वर्षी ‘ग्रँड ट्रंक’ वीकली हे साप्ताहिक सुरू केले आणि मालगाडीच्या डब्यातच प्रयोगशाळा थाटली. मात्र प्रयोगशाळेत स्फोट झाल्याने त्यांना प्रयोगशाळा बंद करावी लागली.
स्वयंचलित यंत्राचा शोध लावला.!
रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याच्या मदतीने ते तारायंत्र (Constellation) शिकले व तारायंत्र प्रचालक (Operator) म्हणून नोकरी करू लागले. या नोकरीच्या काळातच, त्यांनी त्यांचा महत्त्वाचा प्रचालकाशिवाय चालणाऱ्या, एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी बॉस्टन शहरात नोकरी पत्करली. आणि उर्वरित वेळ संशोधनासाठी दिला. तेथे त्यांनी एक मतदान यंत्र तयार केले, या करिता त्यांना 1868 मध्ये पहिले एकस्व मिळाले.
आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले गेले…
न्यूयॉर्कमधील ‘गोल्ड अँड स्टाक’ तारायंत्र कंपनीत काम करत असताना, तेथील यंत्रसामग्री व सेवाप्रणालीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. नोकरीतून उरलेल्या वेळात संशोधन करताना, तारायंत्रासाठी जोडयंत्रणा तयार केली. त्यातूनच मिळालेल्या कमाईतून प्रयोगशाळा स्थापन करून स्वयंचलित वेगवान तारायंत्रणा तयार केली. त्यामुळे नेहमीच्या तारायंत्र तारांद्वारे अनेकपट अधिक संदेशवहनाची सोय झाली. त्याचवेळेस अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी शोधलेल्या टेलिफोनसाठी (Telephone) एडिसनने कार्बन प्रेषक (Transmitter) शोधून एक महत्त्वपूर्ण संशोधन केले. सन 1877 मध्ये, एडिसनने फोनोग्राफचा (मूळचा ग्रामोफोन) शोध लावला. यांत्रिक ऊर्जा वापरून प्रथमच कथिलाच्या पत्र्यावर आवाज लिहिला गेला आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले गेले.
प्रमुख शोध आणि योगदान!!
विजेच्या दिव्याव्यतिरिक्त, एडिसनने इतर अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले :
- फोनोग्राफ : 1877 मध्ये शोध लावण्यात आलेले, फोनोग्राफ हे ध्वनी रेकॉर्ड आणि पुनरुत्पादन करू शकणारे पहिले उपकरण होते. या शोधाचा संगीत उद्योग आणि मनोरंजनावर खोलवर परिणाम झाला.
- मोशन पिक्चर कॅमेरा : एडिसनने मोशन पिक्चर कॅमेरा आणि किनेटोस्कोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाहण्याच्या उपकरणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. या शोधांनी चित्रपट उद्योगाचा पाया रचला.
- दूरसंचारातील सुधारणा : एडिसनने टेलिग्राफ प्रणाली सुधारली आणि टेलिफोनच्या विकासात योगदान दिले, ज्यामुळे संप्रेषण अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह झाले.
- विद्युत ऊर्जा वितरण : विद्युत ऊर्जा वितरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात डीसी वीज प्रणाली विकसित करण्यात एडिसनचे काम महत्त्वाचे होते, जरी अखेर एसी हे मानक बनले.