मुंबई(Mumbai):- आदिवासीच्या अज्ञानाचा गैर फायदा घेऊन त्यांच्या जमिनी बळकावण्याचा विषय आज सकाळी विधान परिषद(Legislative Council) सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात चर्चिला गेला. प्रामुख्याने विदर्भात असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्या जमिनीवर रिसॉर्ट (Resort) बांधले जात असल्याचा आरोप सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला. आमश्या पाडवी यांनी मूळ प्रश्न विचारला होता. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनीवर पेट्रोलपंप बांधल्याचा पाडवी यांनी आरोप केला. यासंदर्भात पाडवी यांनी सभागृहाला कागदपत्रे सुपूर्द केली.
15 दिवसात तपास केला जाणार
प्रश्नाचे उत्तर देताना, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदिवासीच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार गांभीर्याने घेतला असल्याचे सांगितले. या बाबींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री विखे यांनी केली. ही चौकशी 15 दिवसात करण्यात येणार आहे. या प्रकारात एखादा महसूल विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सकारात्मक उत्तर देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल-आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
दरम्यान, आदिवासींच्या बळकावल्या गेलेल्या जमिनी परत करण्याबाबत रायगड जिल्ह्याने मोठी कामगिरी केली असल्याची बाब उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्र्यांना निदर्शनास आणून दिली. त्यावर सकारात्मक उत्तर देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. या प्रश्नांवर सदस्य अभिजित वंजारी व अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.