हिंगोलीत हिंदू आक्रोश मोर्चात हजारो नागरीक सहभागी
हिंगोली (Hindu protest march) : बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंगोलीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बांग्लादेशच्या ध्वजासह राष्ट्रपती महंमद युनूस यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.
बांग्लादेशमधील हिंदू धर्मियांवर होणार्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात १० डिसेंबर रोजी सकल (Hindu protest march) हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या निमित्ताने सकाळी महात्मा गांधी चौकात अनेक सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून बांग्लादेशचा निषेध नोंदवित हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रसेविका समिती, हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ, राजस्थान व्यायाम शाळा, उत्सव फाऊंडेशन, श्री त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समिती, हिंगोली जिल्हा माहेश्वरी युवा संघटन, हिंदू राष्ट्रसेना, हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना, वासवी सेवाभावी संस्था, श्री जलेश्वर संस्थान, श्री शिवप्रतिष्ठाण, अधिवक्त परिषद, श्री धडवाई हनुमान मंदीर अशा विविध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.
आपल्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शिष्टमंडळाला दिले. दिलेल्या निवेदनात बांग्लादेशमध्ये हिंदू धर्मियांवर अन्याय व अत्याचार केले जात असून त्यांच्या मालमत्तासह हिंदू मंदिरावर हल्ले करून तोडफोड केली जात आहे. तसेच महिलांची अब्रुही घेतली जात आहे. या प्रकारामुळे बांग्लादेशमधील हिंदू धर्मिय धोक्यात आले आहे. त्यांना संरक्षण मिळावे तसेच इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराजांना खोट्या गुन्ह्यात अडकून जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय व अशोभनीय आहे. बांग्लादेशमध्ये राहणार्या हिंदू धर्मियांच्या प्रत्येक व्यक्तीच्या मानव अधिकाराचे जतन व्हावे व बांग्लादेशीय हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी भारतातील पंतप्रधानांनी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, मोर्चामध्ये विहिंपचे क्षेत्र कार्यकर्ते अनंत पांडे यांनी बांग्लादेशमधील सत्य परिस्थितीची जाण उपस्थित नागरिकांना करून दिली. या मोर्चामध्ये आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राम कदम, कालीमाता मंदिराचे खुशाल महाराज, खटकाळी हनुमान मंदिराचे भगवानदास महाराज, धडवाई मारोती मंदिराचे सखाराम धडवाई, बद्रीनारायण मंदिराचे अर्चक, धोंडीराज पाठक, डॉ.मुरलीधर तोष्णीवाल, अॅड. दिलीप झंवर, महेश बियाणी, अॅड.आनंद पांडे, उमेश गुठ्ठे यांच्यासह अनेक महिला, पुरूष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये या दृष्टीकोणातून जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
हिंगोली शहरात काढलेल्या मोर्चामध्ये (Hindu protest march) ‘बांग्लादेश मे रक्तपात, मानवाधिकार खोलो आँख’ हे फलक अधिक लक्षवेधी ठरले. यावेळी बांग्लादेशच्या ध्वजासह राष्ट्रपतीच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला.