उमरगा(Latur) :- कलबुर्गी ते लातूर मार्गावर माडज पाटीजवळ झालेल्या पिकअप व मोटारसायकलच्या भीषण अपघातात (Accident) तीन जणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी (दि.१७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातानंतर मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लातूरहून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या बोलेरो पिकअपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील आकाश सूर्यकांत रामपुरे (वय २४) व दिपक गणेश रामपुरे (वय २६, दोघेही राहणार मंगरूळ ता.औसा जि.लातूर) व पिकअपमधील दिगंबर गिरजाप्पा कांबळे (वय ६२ वर्षे रा.येळी ता.उमरगा) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर मारुती विश्वनाथ रेड्डी (वय ५२ वर्ष रा.येळी ता. उमरगा) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. अपघात इतका भीषण होता की, अपघातात दुचाकीचा चक्काचुर झाला आहे. अपघातानंतर मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. अपघात होताच पिकअप चालक घटनास्थळावरुन पसार झाला होता. अपघाताची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.के. कन्हेरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहनासाठी मार्ग खुला केला.