परभणी(Parbhani):- सन २०२४ या वर्षात परभणी जिल्ह्यात ३६ खुनांची नोंद झाली आहे. दर महिन्याला जिल्ह्यात तीन खून (Murder)झाले आहेत. या घटनांबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०२३ च्या तुलनेत २०२४ या वर्षात दहा खून अधिक झाले.
नोव्हेंबर २०२४ पर्यंत खुनाच्या प्रयत्नाच्या ६५ गुन्ह्यांची नोंद
परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आकडा वाढत आहे. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कारवाया केल्या जात असल्यातरी खून, खुनाचा प्रयत्न, अत्याचार(torture), विनयभंग, दरोडा, घरफोडी, चोरी या सारख्या घटना कमी होत नसल्याचे दिसत आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत परभणी जिल्ह्यात खुनाच्या ३६ घटना घडल्या आहेत. सरासरी दर महिन्याला तीन खून झाले आहेत. नोव्हेंबर २०२४ पर्यंत खुनाच्या प्रयत्नाच्या ६५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच २ दरोडे, २५ जबरी चोरी, १५९ घरफोडी झाल्या आहेत. चोरट्यांनी या कालावधीत २९४ दुचाकी, ३७ मोबाईल, ३१ चारचाकी, पशुधन व इतर साहित्य देखील लंपास केले आहेत. चोरीच्या एकूण ७५५ घटनांची नोंद झाली आहे. वर्षभरात शासकीय कामात अडथळ्याच्या देखील घटना घडल्या आहेत.
सन २०२३ चा विचार केला असता त्या तुलनेत सन २०२४ मध्ये विविध प्रकारचे गंभीर, चोरीचे गुन्हे वाढले असल्याचे दिसत आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. परभणी जिल्ह्यात पोलीस प्रशासना अंतर्गत १९ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे नोंद झाले आहेत. काही गुन्ह्यांचा तात्काळ तपास लागला तर काही प्रकरणांच्या तपासासाठी तांत्रिक व इतर बाबींचा उपयोग करावा लागला. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने तडिपार, हद्दपारी सारख्या कारवाया देखील करण्यात आल्या आहेत.