नागपूर/पारशिवनी (Nagpur):- पारशिवनी, रामटेक वनपरिक्षेत्रात दहशत माजविणार्या त्या वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला रविवारला यश आले आहे. तालुक्यातील नयाकुंड शिवारात सायंकाळी ४.३० वाजता दरम्यान वाघाला बंदिस्त करण्यास यश आले. यानंतर या वाघाला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटर (Transit Treatment Center) येथे रवाना करण्यात आले. गत एक महिन्यापासून एकाच परिसरात फिरणारा वाघ शेत परिसर सोडून गावाकडे वळत होता. त्याने पालोरा गावात घुसून एक कालवड मारली. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नयाकुंड शिवारात वाघाला केले बंदिस्त, अनेक दिवसानंतर सफलता
वन विभाग (Forest Department) जरी वाघाला पकडण्याकरिता कंबर कसून तयार असला तरी तो वन विभागाच्या हाती तुरी देऊन पसार व्हायचा चिचभुवन, नयाकुंड, माहुली, काळापाठा, मेहंदी, उमरी, पाली या परिसरात वाघाने (Tiger) धुमाकूळ घातला होता. यावेळी त्याने शेतकर्यांच्या गोठ्यातील जनावरांचा फडशा पाडला. त्यामुळे या गावातील नागरिकांनी वाघाला हुसकावून लावणे सुरू केले होते. त्यामुळे आता वाघाने पेंच नदीच्या किनार्यावरील पालोरा व नयाकुंड गावाकडे आपला मोर्चा वळविला होता. नदी परिसरात शिकार न मिळाल्यामुळे गुरुवारी पहाटे वाघाने चक्क पालोरा गावात प्रवेश केला त्याने गौरव कामडे या शेतकर्याच्या घरी खुंट्याला बांधलेली गाय (cow) मारली. त्यानंतर त्याने गायीला ५०० मीटर अंतरावरील नाल्याजवळ नेऊन फडशा पाडला. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तो वाघ नागरिकांना दिसला. त्यावेळी जवळपास ३०० नागरिकांनी वाघाला पळवून लावले. त्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास वाघ नदी ओलांडून नयाकुंड येथील भीमभट्टा परिसरात गेला होता.
जाणकारांच्या मते हा वाघ साडेतीन वर्षांचा आहे. कदाचित तो चारगाव परिसरात एक महिन्यापूर्वी वावरत असलेल्या नर-मादी व त्यांच्या तीन अपत्यांपैकी असावा. कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर तो पेंच नदी (Pench River) किनारामार्गे या परिसरात आला. कोणत्याही वाघाचा एरिया हा १० किमी असतो. त्यामुळे हा वाघ नयाकुंड गावाच्या १० किमी अंतरावरच आपला अधिवास बनवित असायचा त्याला या परिसरात सहज पाळीव प्राणी उपलब्ध होत होते. त्यामुळे तो एका गावाच्या परिसरातून हुसकावून लावल्यास त्याच परिसरातील दुसर्या गावाच्या परिसरात शिकार करायचा.
१५० कर्मचार्यांची चमू होती सज्ज
या वाघाला पकडण्याकरिता गत २० पेक्षा अधिक दिवसांपासून नॅशनल टायगर कमिटीचे (National Tiger Committee) पथक कर्मचारी पारशिवनी तालुक्यात ठाण मांडून बसले होते. तसेच नागपूर, पारशिवनी, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली येथील तब्बल १५० कर्मचार्यांची फौज वनविभागाने तैनात केली होती. परंतु, वाघाला डॉट मारून पकडणे शक्य होत नव्हते. माहिती नुसार डॉट हा सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मारता येण्याची परवानगी असते. तसेच, तो वाघाच्या फक्त मांडीवरच मारावा लागतो. इतरत्र लागल्यास वाघ मृत देखील होऊ शकतो. तसेच, डॉट लागल्यानंतर तो तत्काळ बेशुद्ध होत नाही तर १५ ते २० मिनिटांत तो हळूहळू बेशुद्ध होतो. यावेळी तो १ ते २ किमी प्रवास देखील करू शकतो. डॉट देताना वाघाच्या वयानुसार व आकारमानानुसार इंजेक्शनचे प्रमाण व प्रेशर असते. त्यामुळे डॉट मारणे ही कसरतच आहे. तो दिवसा लपून बसून व सायंकाळी बाहेर पडायचा. त्यामुळे देखील वन विभागाला वाघ पकडण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
पारशिवनी वनविभागाची टीम वाघाचा शोधात
वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पारशिवनी वनविभागाची(Forest Department) टीम वाघाचा शोधात होते. तर वरिष्ठांनी १५० कर्मचारी व अधिकारी यांचे पथक तयार करून पारशिवनीला पाठवले. शेवटी नयाकुंड शिवारात वाघ असल्याची रविवारी दुपारी मिळाली. त्यावरून वनविभागाने नियोजन करुन पिंजरा लावला.पण तो जंगलात गेल्याने कुशलतेचा वापर करुन डॉटचा वापर केला. डॉट यशस्वी लागल्यार २०० मीटल चालत गेल्यानंतर बेशुद्ध झाला व सायंकाळी ३.४५ वाजता दरम्यान वाघाला जेरबंद करण्यात यश आले. पकडलेल्या वाघाला गोरेवाडा नागपूर येथे उपचार केंद्रात (Treatment centers) पाठविण्यात आले अशी वन आधिकारी यांची माहिती आहे.
ही कारवाई मुख्य वन संरक्षक के. लक्ष्मी, उप वनसंरक्षक भरतसिंग हाड़ा, सहायक वनसंरक्षक हरवीर सिंग, उपवनसंरक्षक कोड़ापे, चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत, क्षेत्र सहाय्यक वाडई, चौरे, वनरक्षक स्वप्नील डोंगरे, प्रवीन पिलारे, उमेश बावने, यांनी प्रयत्न केले.