वलांडी (Farmer suicide) : देवणी (जि. लातूर) तालुक्यातील इस्मालवाडी येथील सोमेश्वर खंडु मुगळे (वय ३३) या तरुण शेतकऱ्यांने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. सोयाबीनचे घटलेले बाजारभाव, गेल्या तीन वर्षांपासून सततची नापीकी, यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, खर्च अन उत्पन्नाचा न बसत असलेला मेळ, कर्जाचे वाढत चाललेले चक्र यामुळे इस्मालवाडी गावातील तरुण व उमद्या शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
गेल्या अनेक दिवसापासून ते विमनस्क अवस्थेत होते. दोन एकर शेतीत कुंटुबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा अन् तीन लेकरांचे शिक्षण त्यांच्या गरजा पुरेशा करण्यात येत असलेल्या अडचणी, कर्जाचा वाढता डोंगर याला कटांळत दोन दिवसापूर्वी ते अचानक निघून गेल्याने कुंटुबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. गुरुवारी भांतब्रा (ता. भालकी, जिल्हा बिदर) येथे त्यांनी गळफास घेऊन (Farmer suicide) आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पार्थिवाचे भालकी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून भालकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.