हिंगोली तालुक्यातील खरबी येथील घटना; ग्रामीण पोलिसात नोंद
हिंगोली (farmer suicide Case) : शेतात उत्पन्न होत नसल्याने व मजुरीचे काम करून गरिबीला कंटाळलेल्या एका ६० वर्षीय वयोवृद्ध अल्पभूधारक शेतकर्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात शनिवारी नोंद घेण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील खरबी येथील केशव रामजी बोचरे (६०) यांना ७४ गुंठ्ठे कोरडवाहू शेती आहे. यंदा त्यांनी शेतीमध्ये लागवड केलेली असताना शेतात उत्पन्न होत नसल्याने त्यांनी मजुरीच्या कामाला सुरूवात केली होती. यातूनच कुटुंबियाची उपजिवीका भागविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सतत येणार्या संकटामुळे केशव बोचरे हे मागील काही दिवसापासून चिंतेत होते.
नेहमीप्रमाणे ते इंचा शेत शिवारात जातो असे म्हणून घराबाहेर पडले. त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला ५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या (farmer suicide Case) केली. जवळपासच्या शेतकर्यांनी हा मृतदेह पाहिल्यावर त्याची माहिती घरी देण्यात आली. शेतात उत्पन्न होत नसल्याने व सततच्या गरिबीला कंटाळून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती अवधुत बोचरे यांनी ९ नोव्हेंबरला हिंगोली ग्रामीण पोलिसात दिली. केशव बोचरे यांच्या पश्चात आई, एक मुलगा,दोन मुली, सून, नातू असा परीवार आहे.