सहा जणांनीच मारला छापा, आरोपींनी टाकल्या धापा!
Latur :- लातूर शहर व जिल्ह्यात राजरोसपणे अवैध धंदे(Illegal business) बोकाळले असून शहराच्या अवतीभोवती असलेल्या नगरांमध्ये व गावांमध्ये अनेक ठिकाणी जुगार अड्डे खुलेआम चालविले जात आहेत. याचा पर्दाफाश दस्तूरखुद्द स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास केला. सहा जणांच्या पथकाने मारलेल्या या छाप्यात सहा जुगारी अडकले मात्र एका जुगाऱ्यासह जुगार अड्डा चालविणाऱ्यानेच पोलिसांना चकवा दिला.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाललेल्या या ‘उद्योगा’ला नेमके बळ कोणाचे?
या छाप्यात पोलिसांनी जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Police station)हद्दीत चाललेल्या या ‘उद्योगा’ला नेमके बळ कोणाचे? या प्रश्नाची उकल पोलीस अधीक्षक करणार आहेत का ? लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी मोहिमा राबविल्या जात आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे (Crime) दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर सक्रिय झाले. त्यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलीस आर्वी शिवारातील विठ्ठल नगर परिसरातील सोमनाथ दत्त याचे घरावर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना 6 जणांना ताब्यात घेतले.
यावेळी एक जुगारी फरार झाला, मात्र जुगार अड्डा चालविणारा कुठे गायब झाला? याचा शोध या पथकातील पोलिसांना लागलाच नाही. या कारवाईत 05,69,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.




