कारंजा(Washim):- लग्नास नकार दिल्याने एका १९ वर्षीय तरुणीच्या तोंडात उंदीर मारण्याचे विषारी पदार्थ (toxic substances) टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १९ जुलै रोजी घडली असून, या प्रकरणी २५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नास नकार दिल्याने आरोपीने विषारी पदार्थ जबरदस्तीने तोंडात टाकला
कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भामदेवी येथील रहिवासी पीडित तरुणी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास स्थानिक एस. टी. बसस्थानक ते नागठाणा मंदिर या रस्त्याने जात असताना आरोपीने तिला मोटार सायकलवर बसवून ‘तू माझ्यासोबत लग्न कर ‘ असे म्हटले. यावर तिने लग्नास नकार दिल्याने आरोपीने चिडून जात ‘ तू माझी नाही. तर कोणाची होणार नाही’ अशी दमदाटी केली व ‘ तुझ्या आई-वडिलांना व भावाला जीवाने मारुन टाकील ‘ अशी धमकी दिली. यावेळी आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने स्वतः जवळील रँट किल हा उंदीर मारायचा विषारी पदार्थ जबरदस्तीने मुलीच्या तोंडात टाकला. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली असून तिच्यावर अमरावती येथील पंजाबराव देशमुख रुग्णालयात(Hospital) उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी तरुणीच्या वडीलांनी फिर्याद दाखल केली असून, त्यावरून आरोपी सेवक राठोड (२२, रा. वापटा ता.मानोरा) याच्याविरुद्ध कलम १२३, १०९, ८७, ३५१(३) भा. न्या. सं. सहकलम ३(१)(आर),३(२) (व्हीअ) अ.जा.ज.अ.प्र. नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी करीत आहेत.




